दीड लाख प्राध्यापक बोगस; एआयसीटीईच्या तपासणीत सत्य उघड; कागदोपत्री कार्यरत प्राध्यापकांची तपासणी

दीड लाख प्राध्यापक बोगस; एआयसीटीईच्या तपासणीत सत्य उघड; कागदोपत्री कार्यरत प्राध्यापकांची तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे दीड लाख प्राध्यापक बोगस असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत आढळून आले आहे. काही इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये अजूनही कागदोपत्री प्राध्यापक कार्यरत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचीही तपासणी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) करण्यात येणार आहे.

देशात इंजिनीअरिंग अर्थात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी शोधणारे विद्यार्थी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी यांच्यामध्ये ताळमेळ राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘एआयसीटीई’कडून नव्या इंजिनीअरिंग महाविद्यालयांंसोबतच फार्मसी, मॅनेजमेंट विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांना मान्यता देण्यात येत नाही.

‘एआयसीटीई’ने सलग तीन वर्षे कमी प्रवेश झालेल्या इंजिनीअरिंग महाविद्यालयांची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणली आहे. त्यामुळेच सुमारे 17 लाखांपर्यंत वाढलेली प्रवेशक्षमता 14 लाख 50 हजारांपर्यंत कमी करण्यात आली आहे. येत्या काळात प्रवेशक्षमता 12 लाखांपर्यंत आणण्याचे नियोजन केले जाणार आहे.

विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे महाविद्यालयांच्या प्रशासनाने प्राध्यापकांची संख्याही कमी केली आहे. तर, काही महाविद्यालयांंमध्ये प्राध्यापकांना कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी ‘एआयसीटीई’ला प्राप्त होत आहे. अनेक इंजिनीअरिंग महाविद्यालयांनी विद्यार्थी; तसेच प्राध्यापकांची खोटी माहिती ‘एआयसीटीई’ला दिली होती. प्राध्यापकांच्या माहितीची पडताळणी पॅनकार्ड आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे केल्यावर सुमारे साडेसहा लाख प्राध्यापकांपैकी दीड लाख प्राध्यापक कागदोपत्रीच असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता ही संख्या पाच लाखांपर्यंत आली आहे.

‘फार्मसी’वर नियंत्रण आणा

देशातील फार्मसी आणि मॅनेजमेंट विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांकडून संबंधित विद्याशाखांचे नवे कॉलेज सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव येत आहे. मात्र, नव्या कॉलेजांना मान्यता दिल्यावर; तसेच कॉलेजांमधील प्रवेशक्षमता वाढल्यावर काही वर्षांनी या विद्याशाखांची परिस्थिती इंजिनीअरिंग विद्याशाखेप्रमाणे होऊ शकते. त्यामुळे नव्या कॉलेजांवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे,’ असे परिषदचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात अभियांत्रिकी शाखांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नोकर्‍या कमी आणि अभियंत्यांची संख्या जास्त यामुळे मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यातच आता नव्याने प्राध्यापकांचे पितळ उघड पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com