कॉलेजरोडवरील ‘ती’ खाऊगल्ली अखेर हटविली; हे आहे कारण…
स्थानिक बातम्या

कॉलेजरोडवरील ‘ती’ खाऊगल्ली अखेर हटविली; हे आहे कारण…

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील कॉलेजरोड व गंगापूररोड यांना जोडणार्‍या डॉन बॉस्को व किलबिल शाळांसमोरून जाणार्‍या रस्त्यावर हॉकर्संना शुल्क आकारत तयार झालेल्या खाऊगल्ली प्रकरणावरुन न्यायालयाने महापालिकेची कान उघडणी केल्यानंतर यांची गंभीर दखल घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार आज (21) तातडीने महापालिका अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील हॉकर्स – टपर्‍यांनी बनलेली खाऊ गल्ली हटविली.

शहरातील कॉलेजरोड व गंगापूररोड यांना जोडणार्‍या व डॉन बॉस्को व किलबिल शाळांसमोरून जाणार्‍या रस्त्यावर हॉकर्संना अतिक्रमण शुल्क आकारून जागा दिल्याप्रकरणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना चांगलेच सुनावले होते.

यासंदर्भातील याचिकेच्या झालेल्या सुनावणीत एक आठवड्यात अतिक्रमण हटवण्याची तंबी न्यायालयाने आयुक्तांना दिली होती. या आदेशानंतर या रस्त्यांच्या दुतर्फा असलेले सुमारे 20 च्या आसपास असलेल्या हॉकर्स व टपर्‍या संबंधीत विक्रेत्यांनी काढुन घेतल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर आज आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग उपायुक्त राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निमुर्लन पथक व पोलीस पथकांनी या रस्त्यावर ठाण मांडत बंदोबस्त कायम ठेवला.

अशाप्रकारे न्यायालयाच्या आदेशानुसार आज ही कार्यवाही झाल्याने डॉन बॉस्को व किलबिल शाळेसमोरील खाऊ गल्ली हटली गेल्याने या भागातील नागरिक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

महापालिकेने शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी डॉन बॉस्को व किलबिल शाळेसमोरून थत्तेनगरकडे जाणारा रस्ता केला. या रस्त्यामुळे वाहतुक कोंडी कमी होऊन अपघाताचे प्रमाण कमी झाले. नंतर या रस्त्यावर गंगापूररोड रस्त्यावरुन हटविलेल्या हॉकर्स – टपरीधारकांना हॉकर्स झोन अंतर्गत तुर्त बसविण्याचे काम महापालिकेने केले.

परिणामी याठिकाणी खाऊगल्ली तयार झाली होती. या अनाधिकृत फेरीवाला क्षेत्राला हटवण्यासाठी दोन्ही शाळेतील पालक, विश्वस्तांनी महापालिकेकडे धाव घेतली. नंतर प्रतिसाद न मिळाल्याने पालकांच्यावतीने संतोष भगत आणि भावेश व्यास यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या भागात हॉकर्स झोनला जागाच नसल्याचे वास्तव

नाशिक पश्चिम भागात असलेल्या गंगापूररोड व कॉलेजरोड भागात शॉपींग सेंटर मोठ्या प्रमाणात असल्याने हॉकर्स झोन तयार करण्यात नागरिक व व्यापार्‍यांचा मोठा विरोध होत आहे. यामुळे याभागात हॉकर्स झोनला स्थानिक नगरसेवकांचा देखील विरोध असल्याने अद्याप हॉकर्स झोन झालेले नाही. त्यामुळे याभागात हॉकर्स झोन कुठे करायचे ? असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com