कोरोनाचा तिसरा टप्पा का महत्त्वाचा? ‘एनआयव्ही’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तांदळे यांची मुलाखत
स्थानिक बातम्या

कोरोनाचा तिसरा टप्पा का महत्त्वाचा? ‘एनआयव्ही’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तांदळे यांची मुलाखत

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । वैशाली शहाणेे (सोनार)

आपण कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या टप्प्यात आहोत. म्हणजेच या व्याधीचे संक्रमण अजूनही प्रवासी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे या टप्प्यात संक्रमणाचा स्त्रोत (सोर्स) शोधता येतो. तिसर्‍या टप्प्यात मात्र स्त्रोत शोधता येत नाही. म्हणूनच संक्रमण तिसर्‍या टप्प्यात पोहोचू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.

त्यासाठीच सामाजिक दुरत्व, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण, गर्दी टाळणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (एनआयव्ही) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

विषाणू किती काळ जिवंत?

संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचा विषाणू किती काळ जिवंत राहतो हे त्या व्यक्तीचे वय, तिची प्रतिकार क्षमता अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पण सामान्यत: हा विषाणू बाधित व्यक्तीच्या शरीरात 14 ते 21 दिवस जिवंत राहू शकतो. काही व्यक्तींच्या बाबतीत हा कालावधी वाढू शकतो. त्यामुळे जनतेने घराबाहेर पडणे टाळणेच गरजेचे आहे.

या विषाणूचा प्रसार मुख्यत्वे थेंब (डॉपलेट्स) यामुळे होतो. बाधित व्यक्तीच्या तोंडातून उडणार्‍या थेंबांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींना विषाणूचा संसर्ग होतो. त्यामुळेच खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल धरायला हवा.

वाढते तापमान

वाढत्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकत नाही अशी चर्चा सुरू आहे. तथापि हा विषाणू नवीन आहे. त्याचा कोणताही इतिहास नाही. शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. तोपर्यंत तापमानाचा व या विषाणूचा काही परस्पर संंबंध आहे का हे सांगणे शक्य नाही.
सध्या 50 पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी केली जाते.

विविध प्रयोगशाळांमध्ये जे नमुने पॉझिटिव्ह येतात ते नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत येतात. एखाद्या व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्या स्त्रावाची पुन्हा एकदा तपासणी करून खात्री करून घेतली जाते. कोरोना बरा झाला की नाही याचेही निदान करताना हीच दक्षता घेतली जाते.

रुग्णांच्या स्त्रावाचे कमीत कमी दोन नमुने निगेटिव्ह येईपर्यंत त्याला डिस्चार्ज दिला जात नाही. सर्व तपासण्या व चाचण्या आंतरराष्ट्रीय सल्ल्याप्रमाणेच केल्या जातात. राष्ट्रीय विषाणू संस्थेची दररोज 200 ते 300 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे.

मास्क कोणी लावावा?

चेहर्‍यावर मास्क लावा. वारंवार हात धुवा यामुळे काय होते असा प्रश्न विचारला जातो. मास्कमुळे संसर्ग टळू शकतो. पण सर्वसामान्य जनतेने मास्क वापरणे गरजेचे नाही. साधा रूमाल वापरला तरी चालेल. फक्त कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी, त्याची काळजी घेणार्‍या व्यक्तींनी आणि त्याच्यावर उपचार करणार्‍या आरोग्यसेवकांनी मात्र मास्क लावणे आवश्यक आहे.

हात धुण्यामुळे संपर्क होणार्‍या भागास संक्रमण टळू शकते. यासाठी साबण व पाण्याने कमीत कमी 20 ते 30 सेकंद आणि हाताचे सर्व भाग स्वच्छ होईपर्यंत हात धुणे गरजेचे आहे. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी उपलब्ध असेल तेव्हा तेच वापरणे योग्य आहे.

कोरोना आणि प्राणी

कोरोनाच्या संक्रमणाचा व कोंबडी-कुत्रे अशा प्राण्यांचा काही संबंध आहे का, असेही विचारले जाते. पण सध्याचा करोना व्हायरस फक्त मानवामध्येच संक्रमित होत आहे. त्याचा इतर प्राण्यांमध्ये शिरकाव अथवा संक्रमण होत नाही, असेही डॉ. तांदळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. लागण झालेल्या व्यक्तीशी संपर्क आला नसेल तर कोणीही घाबरू नये. तथापि प्रत्येक व्यक्तीने योग्य ती काळजी घेतल्यास करोनाचा संसर्ग होणार नाही आणि हे संक्रमण तिसर्‍या टप्प्यात जाणार नाही याची खात्री बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

  • तिसर्‍या टप्प्यात फैलाव अत्यंत वेगाने होतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्यास फार प्रयत्न करावे लागतात.
  • सामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही.
  • सध्याचा विषाणू फक्त मानवामध्येच संक्रमित होत आहे.
  • हा विषाणू नवा आहे. त्याचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे अभ्यास सुरू आहे.
  • संसर्ग झाल्यावर नाक, घसा आणि फुफ्फुसांना प्रभावित करतो.

31 मार्चच का?

31 मार्चच का, असा प्रश्न लोकांना पडला आहे. करोना विषाणूच्या विकासाचा कालखंड साधारणत: 14 ते 15 दिवसांचा असतो. तथापि माणसांच्या वावरण्यावर बंधने आणण्यास दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. विषाणूच्या विकासाचा 15 दिवसांचा कालखंड 31 मार्चला संपतो. याच काळात आपण दक्षता बाळगली आणि लोकांनी सहकार्य केले तर दुसर्‍या टप्प्यातच ही साथ नियंत्रणात येईल. या विषाणूचा संसर्ग झाल्यावर तो प्रथम शरीराच्या नाक, घसा व फुफ्फुसांना प्रभावित करतो, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

संकट अधिक गंभीर

तिसर्‍या टप्प्यात संसर्ग संक्रमणाचे संकट अधिक गंभीर होते. संक्रमणाचा स्त्रोत शोधता येत नाही. कोणाकडून कोणाला बाधा झाली हे शोधता येत नाही. त्यामुळे साथीचा फैलाव खूप वेगाने होतो. मोठ्या संख्येने लोक बाधित व्हायला लागतात. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. याचा ताण सगळ्याच व्यवस्थेवर येतो. त्यामुळेच करोना विषाणूचा संसर्ग तिसर्‍या टप्प्यात जायला नको याची दक्षता सर्वांनीच घेण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com