नाशिक : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचा ठाकुरांवर ‘विश्वास’
स्थानिक बातम्या

नाशिक : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचा ठाकुरांवर ‘विश्वास’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | विशेष प्रतिनिधी

राज्याच्या विधानपरिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्य लवकरच निवृत्त होत आहेत. त्याजागी नव्याने १२ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विश्वास बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याच्या विधानपरिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्य लवकरच निवृत्त होणार आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्य हे विविध क्षेत्रातील जाणकार असावेत, ज्याचा उपयोग राज्याच्या विकासाला होऊ शकेल असे संकेत आहेत.

मात्र, अनेकदा हे संकेत पाळले जात नाहीत, यावेळी मात्र, राज्यपाल हे आपल्या मार्फत सदस्यांची नियुक्ती करतांना असे संकेत पाळण्याचा आग्रह सत्ताधारी पक्षाकडे धरू शकतात.

राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेत असल्याने तीनही पक्षांना ४-४ जागा मिळतील राज्यपाल आणि सरकार यांच्यात सध्या फारसे सख्य नाही, त्यामुळे राज्यपालांनी आपण पाठविलेली नावे नाकारू नयेत, यासाठी तीनही पक्ष आपापल्या पक्षाशी संबंधित पण विविध क्षेत्रातील नावांचा शोध घेत आहेत. यातूनच ठाकूर यांचे नाव पुढे आले आहे.

विश्वास ठाकुर हे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत, शिवाय सांस्कृतिक क्षेत्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वसंत व्याख्यानमाला येथेही ते कार्यरत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असण्याबरोबरच पवार घराण्याशी त्यांचे वैयक्तिक ऋणानुबंध आहेत. ठाकूर यांची अनेकदा लोकसभा, विधानसभा उमेदवारीसाठी चर्चा झाली मात्र, उमेदवारी मिळाली नाही, तरीही ते पक्ष व पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक चेहरे आहेत, शिवाय शरद पवार यांचा विविध क्षेत्रात वावर असल्याने पूर्वीप्रमाणे यावेळीही ते काही मान्यवरांना संधी देऊ शकतात, पण ठाकूर तरुण आहेत., धाडसी आहेत, एखादी कामगिरी सोपविली की ती काटेकोरपणे पार पाडण्यावर ठाकूर यांचा कटाक्ष असतो.

तसेच युवकांना पक्षात अधिक संधी देण्याच्या पवार यांच्या निर्णयाचाही ठाकूर यांना फायदा होऊ शकतो. नाशिक मधून शरद पवार यांचे निकटवर्तीय माजी आमदार हेमंत टकले, विलास लोणारी यांच्या शिवाय पालकमंत्री छगन भुजबळ हेही ठाकूर यांची शिफारस पवार यांच्याकडे करू शकतात. त्यामुळे सध्यातरी राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ठाकूर यांचे पारडे जड मानले जात आहे.

पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती नेहमीच मी पार पाडली आहे, राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी पक्षात अनेक अनुभवी नेते, विचारवंत आहेत, प्रत्येकाला संधी मिळणे शक्य नाही, तरीही पक्ष देईल ती जबाबदारी मी नेहमीप्रमाणे जबाबदारीने पार पाडीन.

विश्वास ठाकूर, चेअरमन, विश्वास बँक नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com