मध्यप्रदेशात पायी जाणार्‍या ३४ मजूरांना नवापुरात केले क्वारंटाईन

मध्यप्रदेशात पायी जाणार्‍या ३४ मजूरांना नवापुरात केले क्वारंटाईन

नवापूर  –

गुजरात राज्यातून मध्यप्रदेशात रेल्वेमार्गाने पायी जाणार्‍या ३४ मजूरांना नवापूर येथील जूना आरटीओ तपासणी नाक्याजवळील शेल्टर होममध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील काही मजूर गुजरात राज्यात मजूरीसाठी गेले होते. परंतू सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मजूरांना काम नाही. त्यामुळे अनेक जण आपल्या घराकडे परतू लागले आहेत. सध्या रेल्वे, बससेवेसह खाजगी प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांचे हाल होत आहे.

असे काही मध्यप्रदेशातील मजूर गुजरात राज्यात अडकून पडले होते. आज सकाळी हे सर्व मजूर गुजरातमधून रेल्वे रुळाच्या मार्गाने चक्क पायी आपल्या गावाकडे निघाले होते. सकाळी ७ वाजता येथील जुना आरटीओ तपासणी नाक्याजवळ गुजरातमधील किंम गावात मजूरी करणारे हे ३४ मजूर नवापूरात आढळून आले. नवापूर पोलिसांनी सर्व मजुरांना सकाळी चहा पाण्याची व्यवस्था केली. प्रशासनाकडून जवळजवळ सहा तासानंतर या मजूरांची उशिरा आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

गुजरात राज्यातील किम गावात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या ३४ मजुरांनी त्यांच्या ठिकाणाहून तीन दिवस पायी चालत आपला प्रवास करत नवापूर गाठले. शहरालगत नेहरू उद्यानाजवळ त्यांना नवापूर येथील स्वयंसेवी संस्था बाबा अमरनाथ गृपच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

नवापूर शहरातील जूना आरटीओ तपासणी नाक्याजवळ गुजरात राज्यातून पायी चालत आलेल्या मध्यप्रदेशमधील युवकाना नवापूर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरिषचन्द्र कोकणी यांनी आरोग्य तपासणी केली. त्यांना लॉकडाऊन असेपर्यंत आरक्षित करण्यात आलेल्या नवीन आरटीओ तपासणी नाक्याच्या सेंट्रल हॉलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन असेपर्यंत नियमित त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आजच्या आरोग्य  तपासणीत कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून आलेले नाहीत, अशी माहिती नंदकुमार वाळेकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com