जागतिक महिला दिन विशेष : नाशिकची ‘राधिका’ बनली पहिली ‘सर्टिफाईड डायग्नॉस्टिक टेक्निशियन’

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | दिनेश सोनवणे

नेहमी म्हटले जाते मुलींना अवजड कामे करू देऊ नका…त्यांना करता येणार नाहीत…कामे वाढवा होतील. पण अत्यंत कमी पसंतीच्या क्षेत्रात मुली आपली जबाबदारी जेव्हा चोखपणे सांभाळतात तेव्हा या रणरागिनींचे कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. कंपनीलादेखील आपल्या कंपनीत या पदावर महिलादेखील काम करत असल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. जगातील मर्सिडिज बेंज कपनीमध्येही अशीच एक मुलगी मॅकेनिकल इंजिनियर जी आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे.

राधिका पाठक असे या नाशिककर मुलीचे नाव आहे. राधिकाने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्या प्रबोधिनीमध्ये पूर्ण केले. काहीतरी करून दाखविण्याचे ध्येय याच ठिकाणी ठेवले असल्याचे ती सांगते. पुढे 11 वी, 12 वी आरवायके महाविद्यालयात तिने पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षणासाठी राधिकाने पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे मॅकॅनिकलचे शिक्षण घेतले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहारीर फोर्ड येथे आंतरवासिता पूर्ण केली. त्यानंतर पुढे अडीच वर्षे राधिका इंडिश मोटर मर्सिडिज बेंजमध्ये मॅकेनिकल इंजिनियर होती. गेल्या तीन वर्षांपासून राधिका भंडारी मर्सिडिज पुणे येथे कार्यरत आहे. मर्सिडिज कंपनीकडून वेगवेगळ्या परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात.

यामध्ये राधिका चांगल्या गुणवत्तेने पास झाली असून नुकतीच तिला मर्सिडिज इंडियातील पहिली सर्टिफाईड डायग्नॉस्टिक टेक्निशियन म्हणून गौरविण्यात आले आहे. मर्सिडीज इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर याबाबतची माहिती पोस्ट करून राधिकाचा गौरव केला होता.

गेल्या तीन पिढ्यांपासून कुटुंबाचा वारसा डॉक्टरकीचा आहे. तिचे आई-वडील डॉक्टर आहेत. राधिकाच्या कुटुंबात ती पहिली इंजिनियर झाली. दहावीपर्यंत तिलाही डॉक्टर व्हायचे होते, पण अकरावी, बारावीत बॉयोलॉजिशी चांगले जुळले नाही, त्यामुळे इंजिनियरिंगकडे आली. तसेच मॅकेनिकल फॅकल्टी फिल्डवरचे काम करायला आवडते म्हणूनच घेतल्याचे ती सांगते.

अनेकदा अवजड कामे आहे, ही मुलगी कशाला आली असावी असे अनेकजण म्हणतात. अनेकवेळा एखादे काम होत नाही तेव्हा पुरुष सहकार्‍यांची मदत होते. काहीजन सुरक्षेच्या दृष्टीने मुलींनी या फिल्डमध्ये न येण्याचा सल्ला द्यायचे. मात्र, जे करायचे ध्येय ठेवले होते ते पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे ती सांगते.

पहिली सर्टिफाईड डायग्नॉस्टिक टेक्निशियन होण्यासाठी राधिकाला अनेक अवघड परीक्षांना सामोरे जावे लागले. यामध्ये पहिल्यांदा वर्कशॉमध्ये ट्रेनि टेक्निशियन म्हणून काम केले. यात हेल्पर म्हणून काम करावे लागले. पुढे एक वर्ष पूर्ण झाल्यावर कंपनीकडून प्रशिक्षणाला पाठविण्यात येते. यावेळी सर्टिफाईड मेंटनन्स टेक्निशियचा किताब मिळाला.

यानंतर पुढील दोन वर्षांत परिक्षा द्याव्या लागतात. या पूर्ण झाल्यानंतर चार वर्षांनी सर्टिफाईड डायग्नॉसिस इंजिनियरचा किताब मिळतो. संपूर्ण मर्सिडिज इंडियामध्ये पहिली महिला असल्याचा मला मान तर मिळालाच, शिवाय कंपनीकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर माझा गौरवदेखील करण्यात आला.

यानंतर कंपनीची नवी टेक्नॉलॉजी, नवीन बदल जे केले जातील, यामध्ये सर्टिफाईड डायग्नॉस्टिक टेक्निशियनला पहिले स्थान दिले जाते. पुढे प्रमोशन होऊन टेक्निकल मॅनेजरपर्यंत जाता येते.

पुढे जाऊन मोटीव्हेशनल स्पीकर आणि बुलेटवर जग पालथे घालायचे आहे. मी प्रचंड बाईकवेडी असून गेल्या पाच वर्षांपासून थंडरबर्ड या बुलेटने वर्कशॉपवर जाते. काम कितीही अवघड असूदेत मी स्वतः करते. मदत लागली तरच इतरांकडून मदत घेते. विविधतेने नटलेला भारत पालथा घालण्यासाठी लवकरच निघणार आहे.

राधिका पाठक, डायग्नॉस्टिक टेक्निशियन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *