हिंगणघाट घटनेवर नाशिककर म्हणतात… कठोर शासन व्हावे; सामाजिक प्रबोधनाची गरज

हिंगणघाट घटनेवर नाशिककर म्हणतात… कठोर शासन व्हावे; सामाजिक प्रबोधनाची गरज

नाशिक ।  प्रतिनिधी

गेला आठवडाभर मृत्यूशी झुंज घेणाऱ्या हिंगणघाट येथील पीडितेच्या आज दि.१० पहाटे उपचारदरम्यान झालेला दुर्दैवी मृत्यू माणुसकीला काळिमा फासणारी ठरली आहे. एकतर्फी प्रेमाला दाद न मिळाल्याने विकेश नगराळे या विकृताने भररस्त्यात पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे. पीडितेची मृत्युसोबतची झुंज अयशस्वी ठरल्यानंतर तिच्या मारेकऱ्याविरोधात समाजातील सर्वच घटकांनी टीकेची उठवली आहे.

पूररोगामी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राला हे लाजिरवाणे कृत्य सहन झाले नसल्याचे आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केवळ हिंगणघाटची पिडीताच नव्हे तर गेल्या दहा वर्षात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमधील आरोपीना फाशी वा तत्सम कठोर शिक्षा तात्काळ करावी असा सूर या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकरांनी व्यक्त केला. केवळ कायदा कठोर करून चालणार नाही तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.

याबरोबरच सामाजिक प्रबोधनाची आणि स्त्री -पुरुष समानतेची शिकवण देखील आजच्या पिढीला देण्याची गरज हिंगणघाटच्या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. समाजातील सर्वच स्तरातून निषेधाचा सूर उमटलेल्या या घटनेबद्दल नाशिककरांच्या प्रतिक्रिया ….

महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे फास्टट्रॅक नायालयात चालवून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे . भारतात देखील इतर देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत. पीडितेला व तिच्या कुटुंबाला तात्पुरत्या स्वररूपात संरक्षण दिले जाते. मात्र त्यानंतर संबंधित आरोपी किंवा त्यांचे कुटुंबीय पीडिता व तिच्या नातेवाईकांना पुन्हा पुन्हा त्रास देतात. गुन्हेगारालादयामाया न दाखवता तात्काळ शिक्षा हाच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय ठरेल. अशा प्रकरणांत फाशीचीच शिक्षा योग्य राहील.

– डॉ. मनीषा जगताप ( रोटरी सदस्या )

हिंगणघाट सारख्या घटनांमुळे महिलांचचे अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आले असल्याचे उघड झाले आहे. दरवेळी अशी घटना घडल्यानंतर कँडल मोर्चे काढून निषेध नोंदवणे बंद करावे व या घटनांना जबाबदार असलेल्या नराधमांना भरचौकात जिवंत जाळनये अधिक योग्य राहील. या हिंस्र श्वापदांना शिक्षेसाठी कितीही कडक कायदे असले आणि अजूनही केले तरी त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही हीच मोठी शोकांतिका आहे.आपल्या देशात महिला अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यात कोणतीही कडक शिक्षा दिली जात नाही म्हणून
अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

– प्रा. मंगल सांगळे (साहित्यिक)

भक्कम मानसिकतेचा समाज उभा न राहता केवळ बघ्यांच्या समाजात आपण राहतोय काय असा प्रश्न नेहमीच पडतो. अत्यंत भयग्रस्त वातावरणात मुलींनी आणि स्त्रियांनी जगायचे कसे ? स्त्रीकडे केवळ भोगवस्तू किंवा ‘माझी हक्काची’ या अर्थाने न पाहता स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी समाजामध्ये निर्माण पाहिजे. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला जगण्याचा अधिकार आहे, स्वतःचा सन्मान आहे तो जपण्याची गरज आहे. समाज माध्यमांनीही सक्षम होणे गरजेचे आहे आणि संवेदनशीलता जपण्याची गरज आहे. प्रेम माणसाला जगायला शिकवते प्रेम विकृत कधीच असू शकतनाही. निर्भया, उन्नाव, बेंगलोर, हिंगणघाट सारख्या घटना कधीही घडू नयेत यासाठी प्रत्येक महिलेचा सन्मान करणे गरजेचे आहे. आणि याची सुरुवात सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून करणे संयुक्तिक राहील.

– आरती बोराडे (कवयित्री)

आज समाजाची मानसिक स्थिती बिघडलेली असून संस्कारहीन वर्तन महिलांबाबतीत घडताना दिसत आहे. महिलांना घटनात्मक मिळालेला स्वातंत्र्य, समानतेचा अधिकार लोप पावला असून पुरुषी अहंकाराचा बळी हिंगणघाटची भगिनी ठरली आहे. स्वातंत्रता समानतेचा अधिकार नष्ट होत चाललेला आहे. शासनाने महिलांविषयी कायद्याच्या विशेष तरतुदी करून महिलांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. जेणेकरून महिला अत्याचारासारख्या अक्षम्य घटना टाळता येतील. महिलांनी देखील अन्याय अत्याचाराविरोधात गप्प राहून चालणार नाही. शारीरिक आणि मानसिक छळासारख्या घटना नजरेआड आड़ न करता पुरुषी विकृतीच्या विरोधात
महिलांनी पुढे येण्याची हिम्मत दाखवली पाहिजे.

– दर्शना सौपुरे (शासकीय अधिकारी)

माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणून हिंगणघाटच्या घटनेकडे बघावे लागते हिची सामाजिक दृष्टया लाजिरवाणी गोष्ट आहे. आज आपण तंत्रज्ञानाच्या गप्पा मारतो आहोत पण माणसाची विचारसरणी किती अधोगतीकडे वळते आहे याचा विचार मात्र करत नाही. समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर असुरक्षितपणाची भावना आहे. हिंगणघाटच्या घटनेत समाजात संस्कारित
पिढी घडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या एका शिक्षिकेवर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. पुरोगामी विचारांचा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी सुरक्षित नाहीत हि सर्वांसाठीच शरमेची गोष्ट आहे. दिल्लीची निर्भया किंवा हिंगणघाटची असो, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा योग्य राहील. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदे अधिक कठोर बनवले पाहिजेत.

– शितल सांगळे (माजी जि.प. अध्यक्षा)

आज अजाणत्या बालिकेपासून वृद्धेपर्यंत सर्वच वयोगटातील महिला पुरुषी अहंकाराचा बळी ठरत आहेत. हि सामाजिक विकृती केवळ कायदे कठोर केले म्हणून संपणारी नाही. कुटुंबांच्या पातळीवर केवळ आई-मुलींमध्ये नव्हे तर वडील आणि मुलीमध्ये, आई व मुलामध्ये सकारात्मक संवाद घडणे अपेक्षित आहे. शालेय वयात मुला-मुलींचे सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन होणे हि काळाची गरज आहे.
स्त्रीचा सन्मान हि आपली संस्कृती आहे, मात्र हा सन्मान जपण्याची शिकवणच दिली जात नाही. स्त्री – पुरुष समानतेचा डिंगोरा पिटत बसण्यापेक्षा जागरूकता कशी करता येईल हे महत्वाचे आहे. हिंगणघाटसारख्या घटना टाळायच्या असतील तर षंढ बनलेली समाजव्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

– अमृता पवार ( जि.प. सदस्या )

गुन्हेगाराला जागेवर शासन हाच महिलांवरील अत्याचार रोखण्याचा जालीम उपाय राहील. आपल्या भोवताली अशा अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र त्याकडे जागरूक सामाजिक घटक म्हणून कुणीच गांभीर्याने बघत नाही. मला काय त्याचे .. ? अशी वृत्ती आपण बाळगतो आणि त्यातूनच विकृतांचे फावते. पालकांनी देखील आपली मुले मुली काय करतात, कुठे आणि कोणाबरोबर फिरतात,
त्यांना कुणी त्रास तर देत नाही ना याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काळात आणि आजच्या घटनेत पीडितेने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची कल्पना देऊनही सामाजिक गरज म्हणून वाईट प्रवृत्तींच्या बीमोडासाठी कुणी पुढे येण्याचे धाडस दाखवल्याचे दिसत नाही. सगळ्याच गोष्टी कायद्याने नियंत्रणात आणणे शक्य नाही. त्यासाठी सामाजिक जागरूकतेची गरज आहे.

– नारायणशेठ वाजे (सहकारातील नेते)

हिंगणघाटची घटना समस्त स्त्री जातीची अवहेलना आहे. एखादी तरुणी आपल्या एकतर्फी प्रेमाला भीक घालत नाही म्हणून हुकूमत गाजवणारी वृत्ती समाजात नवीन नाही. आज एखाद्या निर्भयाचा बळी गेल्यावर न्यायासाठी मोर्चे काढले जातात, आंदोलने केली जातात. पण जिवंतपणी तिला भोगाव्या लागणाऱ्या यातनांकडे कोणीच लक्ष देत नाही. सोशल मीडियामुळे आपण एका क्षणात जगाशी
जोडले जातो पण माणुसकीचे बंध निखळताहेत त्याचे काय ? आताच्या आई उद्या येणाऱ्या पिढीला महिला सन्मानाचे धडे देण्याची वेळ आली आहे. हिंगणघाटच्या दुर्घटनेवरून आता तरी समाजाने आणि सरकारने बोध घेतला पाहिजे.

– आरती शिरवाडकर ( आकाशवाणी वृत्तनिवेदिका )

महिला व मुलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या हि चिंतेची बाब आहे. एखादी घटना घडून गेल्यावर कायद्याचा किस पाडला जातो. मात्र पुढे दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेत हकनाक बळी गेलेल्या पिडीतेसोबतच तिच्या पालकांना केवळ उंबरठे झिजवण्याची वेळ येते. अत्याचाराच्या अशा घटनांमध्ये सरकारने कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. घटना घडल्यावर केवळ घोषणा करून भागणार नाही तर उद्या महिला आणि मुलीमध्ये सामाजिक सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी गुन्हेगाराला तात्काळ शासन करणे
हा प्रभावी उपाय ठरेल. पालक म्हणून मुलीच्या भवितव्याची काळजी प्रत्येक आई-वडिलांना आहे. भविष्यात कुणाच्या आई-बहिणीच्या इज्जतीला हात घालायची हिम्मत कुणा वीकृतामध्ये निर्माण होऊ नये एवढीच अपेक्षा

– विजय गुरुळे ( सामाजिक कार्यकर्ता )

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com