दुर्गभ्रमंतीचे द्विशतकी ‘साहस’; नोकरी करताना जोपासला छंद

नाशिक । दिनेश सोनवणे

दुर्ग एके दुर्ग…भटकंतीचा नाद लागला की, माणूस तहानभूक विसरून रानोमाळी भटकू लागतो असे म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील एका अवलियालाही असाच एक छंद गेल्या काही दिवसांपासून लागला आहे. नियमित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करत संसार, नातंगोतं सांभाळून या अवलियाने आतापर्यंत दोनशे गड सर केले आहेत. दीपक पवार असे या अवलियाचे नाव आहे.

दीपक मुळचे बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील असून सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश (मायको) कंपनीत 25 वर्षांपासून नोकरीस आहेत.

आपल्या आसपास दिसणार्‍या गडकिल्ल्यांचा अभ्यास करत सर्वोच्च शिखरावर वंंदन करण्याचे दीपक यांचे एकेकाळचे स्वप्न होते. वयाच्या चाळीशीनंतर त्यांनी हे स्वप्न पूर्णत्वास आणण्याचे ठरवले. सह्याद्रीतील विविध राजवटींनी कशा प्रकारे गडांचा उपयोग केला असावा. तसेच शिवाजी राजेंनी दुर्ग, सह्याद्रीतून कसे स्वराज्य उभे केले असावे.

असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. यांची उत्तरं शोधण्यासाठी 2016 व 2017 दोन वर्षांत प्रथम शतक दुर्गचढाई यशस्वी केली. पुन्हा हिच यशाची पावती व प्रेरणा घेत 2018 वर्षे 2019 पुन्हा दोन वर्षांत नवीन दुर्गांना भेट देत दुसरे शतकी दुर्गभ्रमंतीचे अनोखे साहसी गिर्यारोहण केले. यामध्ये नाशिकच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अवघड ते अतीअवघड दुर्गांचे साहसी पर्यटन केले.

2018 व 2019 हे दोन वर्षांत पुन्हा दुसरे शतकी दुर्गभ्रंमतीचे उद्दिष्ट्य ठेवत 2018 जानेवारी कळवण डांगसौदाणे जवळील भिलाई दुर्ग भटकंतीपासून सुरुवात केली. बहुला, सुधागड, जवळा, खैराई असे अनेक दुर्गाना भेट दिली. ऑगस्ट महिन्यात पन्हाळगड ते पावनखिंड ही मोहीमसुद्धा यशास नेली.

नाशिकचे गिर्यारोहक, लेखक प्रशांत परदेशी यांचे स्वप्न केमच्या डोंगरापासून तवला, अचला, अहीवंत, सप्तशृंगी, मार्केंडेय, रवळा- जवळा, धोडप, लेकूरवाळी, कांचना, राजदेहेर, कोळदेहर, इंद्राई होत चांदवडला दि.1 ते 10 डिसेंबर 2018 डोंगरधरेने सातमाळा डोंगरयात्रा दोघांनी पूर्ण केली.

2018 मध्ये 44 दुर्गाची डायरीत नोंद झाली. 2019 च्या जानेवारी महिन्यात पनवेल जवळील कलावंतीण दुर्गापासून श्रीगणेशा करत कण्हेरा, हडबीची शेंडी, कात्रा, सिंदोळा तर फेब्रुवारी महिन्यात आसावा, कोथळीगड, बळवंतगड, भूपतगड सर केले. मार्च महिन्यात पुण्याजवळील लोहगड विसापूरला भेट देऊन त्यांनी काढलेले छायाचित्र व लेख महाराष्ट्रातील अनेक गिर्यारोहण मित्रांनी पसंत केले.
ऑगस्ट महिन्यात परिवारासोबत नाणेघाट केला.

पेब, मोरधन करत महाराष्ट्र सीमेच्या काही अंतरावर गुजरातमधील रूपगड केला. सप्टेंबर महिन्यात बागलाणच्या पश्चिमेला असणार्‍या दहिंदुले गावाजवळील दिर- भाऊजाई डोंगरावर दीपक पवार हे पहिले गिर्यारोहक यांचे पाऊल पडले.

ऑक्टोबर महिन्यात नाशिकपासून जवळ वाडीवर्‍हेजवळील डांग्या सुळका माथा नाशिकच्या पांईट ब्रेक समूहासोबत यशस्वी केला. नोव्हेंबर कर्नाळा, वाघेरा, रवळा दुर्ग पदरात पडली. डिसेंबर 2019 डुबेरगड, वासोटा, सज्जनगड, अजिंक्यतारा, तैलबैला, घनघड दुर्ग सर करत दुर्गांचे दुसरे शतक 22 डिसेंबर 2019 रोजी पनवेल जवळील प्रबळगडाच्या सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवत पूर्ण केले.

अशी घ्या काळजी

भटकंती करताना चांगले शूज वापरावेत. कुठेही जा सोबत बॅटरी असली पाहिजे. एकटे जात असाल तर वाटाड्या आणि सुळका चढावयाचा असल्यास समूहाने जावे. अनेक दुर्गांवर पाण्याची सोय नसते, यावेळी जीवनड्रॉप पाण्याची बाटली सोबत असावी. जेवणाचे जास्त सामान न घेता सुकामेवा सोबत असावा.

– दीपक पवार, साहसी गिर्यारोहक नाशिक