नाशिकचा अभिनेता चिन्मय उदगीरकर याच्याशी गप्पा
स्थानिक बातम्या

नाशिकचा अभिनेता चिन्मय उदगीरकर याच्याशी गप्पा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिकमधील आर. वाय. के. सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला चिन्मय आज मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातून राज्य गाजवत आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे कोणते क्षेत्र निवडल्यावर मी माझी अभिनयाची आवड जपू शकतो, याचा मी सारासार विचार तेव्हाच केल्याचे चिन्मय नेहमी सांगतो.

‘सैराट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मेकअप’ या आगामी चित्रपटात रिंकू दिसणार असून अभिनेता चिन्मय उदगीरकरही तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. ‘मेकअप’ च्या निमित्तानं पहिल्यांदाच चिन्मय आणि रिंकू अशी आगळीवेगळी जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने चिन्मय उदगीरकर याच्याशी सांधलेला संवाद…

रिंकू, गणेश पंडित आणि इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव…

खरंच खूपच अविस्मरणीय. या सिनेमातील सर्व कलाकार हे अभिनयातील विद्यापीठच होते. या चित्रपटातील सर्व कलाकार अगदी मुरलेले होते किंबहुना आहेत. आमच्यात सर्वात अनुभवी कलाकार म्हणजे गणेश पंडित. तो छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा इतक्या मनापासून आणि प्रेमाने सांगायचा, की आमच्या डोळ्यांसमोर पूर्ण चित्र उभे राहायचे.

नुसते दिग्दर्शन नाही तर सर्वच विभागात त्याने स्वतः लक्ष घातले. रिंकू बद्दल काय आणि किती सांगू असे होतेय. तिच्यासोबत काम करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, ‘सैराट’ सिनेमाचे यश हे तिला नशिबाने मिळाले नाहीये, ते यश मिळवण्यासाठी ती पात्र होतीच.

तिच्यात असणारा नम्रपणा आणि समोरच्याची ऐकून घेण्याची तिची कला वाखाणण्याजोगी आहे. एखादी गोष्ट येत नसेल तर ती लगेचच ते मान्य करते. कोणी सल्ले दिले तर ती ते मान्य करते. तिची तर अजून सुरुवात आहे अजून खूप लांबचा पल्ला तिला गाठायचा आहे. या व्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, सुमुखी पेंडसे, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ या सर्वांकडून मला बरेच काही शिकायला मिळाले.

‘मेकअप’ चित्रपटाच्या नावातच वेगळेपण आहे. नक्की काय आहे ‘मेकअप’?

‘मेकअप’ हा अतिशय सुंदर चित्रपट आहे. आपण जर शब्दकोश पहिला तर त्यात ‘मेकअप’ या शब्दाचा अर्थ ‘व्यक्तीचं चारित्र्य, थोडक्यात व्यक्तिमत्व’ असा सुंदर दिला आहे. कलाकार नसलेल्या व्यक्ती सामान्य आयुष्यात मेकअप करूनच वावरत असतात. एक प्रकारचा मुखवटा चढवूनच वागतात.

वेळ, काळ, परिस्थिती यानुसार ते आपला मुखवटा बदलत असतात. काही लोकांच्या जीवनात अशा घटना घडतात ज्यामुळे ते आतून बाहेरून पूर्णपणे बदलून जातात. त्यांना कोणत्याही मेकअपची गरज उरत नाही. अशाच घटनांचा आणि प्रेमकथेचा सुंदर प्रवास म्हणजे ‘मेकअप’.

तुझी भूमिका काय?

या सिनेमात मी डॉक्टर निलची भूमिका साकारत आहे. डॉक्टरसोबतच मी एक मेकअप मॅन सुद्धा आहे. हा मेकअप मॅन बघण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. असो, जसे मी माझ्या आधीच्या उत्तरात म्हटले, प्रत्येक व्यक्ती एक मुखवटा घेऊन वावरत असतो. एखादा डॉक्टर आपल्या पेशंटचा इलाज करताना स्वतःचा देखील इलाज करत असतो. स्वतःमध्ये असणाऱ्या भावभावनांचा इलाज देखील तो त्यावेळी करत असतो. हे सर्व करताना तो एका मुखवटाच घालून मिरवत असतो. असाच एक डॉक्टर मी ‘मेकअप’ चित्रपटात साकारला आहे.

शूटिंगच्यावेळी घडलेला एकदा किस्सा

आम्ही एक मोंटाज शूट करत होतो. तो मोंटाज बघण्यासाठी आम्ही मॉनिटर जवळ गेलो. तिथे एक भिंत आणि खांब होता. त्याला एका कमानीचा लुक दिला होता. मोंटाज बघताना मी त्या भिंतीला टेकून उभा होतो, अचानक ती भिंत कोसळली. त्यात मला आणि गणेश दादाला लागले. मला लागले आहे हे माझ्या लक्षात आले.

मात्र गणेश दादाकडे लक्ष असल्यामुळे मी ही बाब एवढ्या गांभीर्याने घेतली नाही. थोड्यावेळाने माझ्या डोक्यातून रक्त येत असल्याचे मला कळले. सेटवरच्या लोकांनी आम्हा दोघांना दवाखान्यात नेले. माझ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने या सगळ्याचा परिणाम आमच्या शूटिंगवर अजिबात झाला नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच जोमाने सेटवर हजर होतो.

नाटकात कधी दिसणार?

मला नाटकात काम करायला नक्कीच आवडेल. नाटक हा आमचा कलाकार लोकांचा आखाडा आहे. अभिनयाची तालीम रंगभूमीवरच होत असते. त्यामुळे नाटक तर मी करणारच. मला सुद्धा नाटकाचा, ‘लाईव्ह’ प्रेक्षकांचा, त्यांच्या टाळ्यांचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांची दाद ऐकायची आहे. आशा करतो मी लवकरच नाटकात दिसेन.

आगामी प्रोजेट्स कोणते?

माझी एक ‘टिक टॉक’ नावाची वेबसिरीज प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘वाजवूया बँड बाजा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. शिवाय एक ‘दीर्घांक’ आहे आणि काही सिनेमांवर चर्चा चालू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com