जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड डिसेंबरअखेर?
स्थानिक बातम्या

जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड डिसेंबरअखेर?

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । जिल्हा परिषदेचा पदाधिकारी होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले असून या सर्वांच्या नजरा अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड कार्यक्रम केव्हा घोषित होतो याकडे लागले आहे.निवडणूक महिना अखेरला म्हणजेच 28 किंवा 29 डिसेंबरला लागण्याची शक्यता आहे. यासाठी 20 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून अजेंडा काढला जाणार असल्याची खात्रीदायक वृत्त आहे. त्यामुळे महिना अखेर जिल्हा परिषदेला नवीन अध्यक्ष-उपाध्यक्ष मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकार्‍यांचा अडीच वर्षांची मुदत ही 21 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली.मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात पदाधिकार्‍यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतवाढीचा अध्यादेश 23 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता.

त्यामुळे या तारखेपासून पुढे 120 दिवसांचा कालावधी ग्राहय धरत ग्रामविकास विभागाने गेल्या आठवडयात नवीन आदेश काढत, विद्यमान पदाधिकार्‍यांना दिलेली 120 दिवसांची मुदत ही 20 डिसेंबर रोजी संपत असल्याचे सांगत, नवीन पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया त्वरीत करणे अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच कार्यवाही करावी असे आदेश पत्रात म्हटले होते. परंतू, हे पत्रापाठोपाठ काही तासातच नव्याने पत्र ग्रामविकासकडून काढण्यात आले.

यात 20 डिसेंबररोजी वाढीव मुदत संपत असल्याने त्यानंतर ही प्रक्रीया राबविण्यात यावी असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 20 डिसेंबरनंतर हा कार्यक्रम जाहीर करावा असे सुचविले. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्य सरकराचे हिवाळी अधिवेशन असल्याने 20 डिसेंबर नंतर ही प्रक्रीया राबवावी असे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. या नवीन आदेशानुसार 20 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीचा अजेंडा काढण्याची तयारी केली आहे. 20 डिसेंबरनंतर आठ दिवस गृहीत धरल्यास 28 किंवा 29 डिसेंबरला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक होण्याची शक्यताआहे.

आघाडी की नवीन समीकरण

राज्य शासनाचे दि.20 डिसेंबरपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुक घ्यावी,असे आदेश प्राप्त होताच राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. त्यानंतर पुन्हा पत्र प्राप्त आलेे असले तरी या महिना अखेर ही निवडणुक प्रक्रीया होणारच असल्याने, इच्छुक तयारीला लागले आहेत.यातच, रिक्त तीन जागांसाठी असलेली निवडणुक प्रक्रीया ही पूर्ण झाली आहे. निवडणुक लागण्याची शक्यता लक्षात घेऊन, नेमके सत्तेचे कसे समीकरण येणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेत एकाही पक्षांकडे बहुमत नसल्याने कोणत्याही दोन पक्षांना सत्तेसाठी एकत्र यावे, लागणार आहे. राज्यात सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली आहे. हीच महाआघाडी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कायम राहणार की नवीन समीकरण उदयास येणार याकडे आता लक्ष लागले आहे.

पक्षीय झालेले बलाबल
शिवसेना : 25
राष्ट्रवादी – 15
भाजप- 15
काँग्रेस – 8
माकप – 3
अपक्ष – 6
रिक्त -1

Deshdoot
www.deshdoot.com