लासलगाव : पाणी पिण्यासाठी गेला अन् अपघातातून वाचला
स्थानिक बातम्या

लासलगाव : पाणी पिण्यासाठी गेला अन् अपघातातून वाचला

Gokul Pawar

Gokul Pawar

विंचूर : येवल्याहुन नाशिक कडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बस दुभाजक सोडून विरुद्ध दिशेला एका पंचर दुकानात शिरली. बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा वगळता सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास येवल्याहुन नाशिक कडे जाणारी बस (एम एच १४ बी.टी.३३३२ ) येथील हॉटेल किनाऱ्याजवळ आली असता दुभाजकावरुन विरुद्ध दिशेने जात एका दुकानात शिरली. बसमध्ये जवळपास पंधरा प्रवासी होते. टायर पंचर दुकानात बस शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. दुकानाची पत्र्याची शेड संपूर्ण उद्ध्वस्त झाली असून दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. ग्रामपालिका सदस्य निरज भट्टड, महेंद्र पुंड, अनिल विंचुरकर, ज्ञानेश्वर शिरसाट यांसह स्थानिकांनी मदत कार्य केले. याप्रकरणी चालक सतीश अशोक जमदाडे यांच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशीब बलवत्तर होते म्हणून दुकानातील गोलू मन्सुरी हा युवक वाचला. अवघ्या एक मिनिटापूर्वी झोपेतून उठून तो पाणी आणण्यासाठी बाहेर गेला असता काही पावलांवरच दुकानात बस शिरत असल्याचे त्याने बघितले. मात्र सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दुकानातील साहित्य अक्षरश चक्काचूर झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com