दत्तजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम
स्थानिक बातम्या

दत्तजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा ११ डिसेंबर ला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. दत्त जयंती दिवशी दत्तात्रेयची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता. आज शहरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

रविवार कारंजा येथील एकमुखी दत्तमंदिरात श्री दत्तजयंती सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायणासोबत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या बुधवारी होणार्‍या दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मंदिराच्या आवारात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दत्तजयंती सोहळ्यात लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण, महिला भजनी मंडळांचा भजनाचा दैनंदिन कार्यक्रम होत आहे. जोशी बुवा यांचे रोज सायंकाळी साडेसहा वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

सोमवारी रुद्राणी नाईक (पुणे) यांचे नारदीय कीर्तन व पं. अविराज तायडे यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. आज गुरुकृपा तबला अकादमाचे पं. जयंत नाईक यांचा तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे.

तर उद्या बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता श्री एकमुखी दत्त छंद भक्त परिवार व पुजारी मयूर बर्वे यांच्या हस्ते पूजा आणि श्री दत्तजयंती सोहळा होणार आहे. भाविकांना मंदिरात दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली असून गोदाघाटाच्या बाजूने भाविकांना रांगा लावून दर्शन घेता येणार आहे.

श्री जयंती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि. 15) सकाळी 9 वाजता श्री दत्तयाग होणार आहे. सोमवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता श्री दत्तयाग पूर्णाहुती होईल. शुक्रवारी (दि. 20) महाप्रसाद आणि शनिवारी (दि. 21) सायंकाळी 5 वाजता श्री सत्यदत्त महापूजा व गोपालकाला हे कार्यक्रम होणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com