त्र्यंबकेश्वर : कुशावर्तातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न मिटणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : कुशावर्तातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न मिटणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थतील पाणी शुद्धीकरणासाठीबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच या बैठकीत मुंबई येथील मत्सालय उभारणीबाबत बोलतांना त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचाही उल्लेख केला. या ठिकाणी असणाऱ्या कुशावर्तात लाखो भाविक स्नान करतात. त्यामुळे येथे योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे महत्वाचे ठिकाण मानले जाते. या ठिकाणी कुशावर्त तीर्थ असून कुंभमेळा व इतर दिवशी लाखो भाविक स्नान करीत असतात. परंतु कालांतराने येथील पाणी अस्वच्छ होत असते. त्यासाठी देखील फिल्टरेशनकरिता मागील कुंभमेळ्यात फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता खालावल्याने सध्या योग्य ती स्वच्छता होत नाही. दरम्यान काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान कुशावर्ताच्या जलशुद्धीकरणासाठी येथील नगरपालिका दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल नगर पालिका अदा करीत असते. इतके पैसे खर्च करुनही पाणी शुद्ध होत नसेल तर या फिल्टरेशन प्लँटची क्षमता तपासण्याची आवश्यकता आहे. कुशावर्ताच्या शुद्धीकरणासाठी सन २०१५च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अडीच कोटी रुपये खर्च करून हा फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तीन वर्षे हा प्लँट चालवला आणि नंतर पालिकेस हस्तांतरीत केला. तथापि तीन वर्षांपासून सुरू असलेले जलशुद्धीकरण चौथ्या वर्षांनंतर त्याची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामास गती दिल्यास पाण्याची शुद्धता कायम ठेवण्यास यश येईल.

Deshdoot
www.deshdoot.com