सुरगाणा : डोंगऱ्या देव आणि पावरीचे सप्तसूर उमटले गोव्याच्या रंगमंचावर.. !
स्थानिक बातम्या

सुरगाणा : डोंगऱ्या देव आणि पावरीचे सप्तसूर उमटले गोव्याच्या रंगमंचावर.. !

Gokul Pawar

सुरगाणा : गोवा राज्याने आयोजित केलेल्या ०७ व ०८ डिसेंबर रोजीच्या आदिवासी लोकोत्सवात डोल्हारे येथील वीर एकलव्य आदिवासी कलापथकाने पावरी नृत्य सादर केले. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उर्जा मंत्री निलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पावसकर आदि उपस्थित होते.

गोवा सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी लोकोत्सव गोवा कोंकण या आदिवासी कला महोत्सवात आपली आदिवासी सांस्कृतिक पावरी नृत्य, ठाक-या नाच, तुर नृत्य ही कला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकून दाद मिळवली. या महोत्सवात राजस्थान, गुजरात, झारखंड तसेच महाराष्ट्रातील नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी कलापथक सहभागी झाले होते.

दरम्यान डोल्हारे येथील कलापथकाची निवड आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या तर्फे करण्यात आली होती. जिल्ह्यातून एकमेव कलापथक सहभागी झाले होते. देशातील वेगवेगळ्या प्रांतातील आदिवासी भाषा, कला, संस्कृती, परंपरा यांचे आदान प्रदान व्हावे तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कलापथकाचे प्रमुख डॉ.हिरामण गावित, आदिवासी बचाव समितीचे सदस्य यशवंत पवार, आदिवासी बचाव कृती समितीचे तालुका अध्यक्ष व आदिवासी शिक्षक डांगी भाषा संस्कृतीचे अभ्यासक रतन चौधरी,विनायक गावित यांनी केले आहेत. या कलापथकात मुकुंद पाडवी, सुरेश पाडवी, रवींद्र पाडवी, परशराम पाडवी, पाडवी, प्रकाश पाडवी, सुभाष बागुल, पंढरीनाथ पवार, हेंमत पाडवी, महेंद्र वळवी, जयराम भोये, लक्ष्मण वळवी,गोविंद वाघ, राजेंद्र पाडवी, जयवंत पवार, मनोज कुवर, नितीन ठाकरे, पावरी वादक जिवा चव्हाण, तुर वादक लहानू दिवा,आदिं कलाकारांचा समावेश होता. या महोत्सवात कलापथकाची गोवा ट्रायबल वेल्फेअर गोवा सरकार तर्फे निवड करण्यात आली होती.

या महोत्सवात गोव्यातील आदिवासी जमाती गावडा, कुणबी, वेळीप या जमातीने सादर केलेले गोफ, शिगमोत्सव तोणया, मेळ, थेंगे, संसार पाडवा,दिण्या नृत्य सादर केली. तसेच आदिवासींच्या पुरातन वस्तू, शेतीची अवजारे, घरगुती वापरातील नामशेष झालेल्या दुर्मिळ वस्तू, पारंपरिक शृंगारिक वस्तू मांडण्यात आल्या होत्या.

या तीन दिवशीय राष्ट्रीय कला महोत्सवात विविध राज्यांतील आदिवासी, कला, संस्कृती, खाद्य, वेशभूषा, बोलीभाषा, आदिवासी समाजातील अंलकार, आभूषणे, हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन, आदिवासींचे पारंपारिक वाद्य, नृत्य, संगीत, चित्रकला, वारली पेंटिंग, आदिवासींचे अश्मयुगीन काळ ते आधुनिक काळातील हत्यारे आदिंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या आदिवासी कला महोत्सवात दोन दिवसात हजारों पर्यटकांनी गर्दी केली होती. गुजरात डांगी नृत्य, कहाळी नृत्य, डोंग-या देव आदि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

या कलापथकाला आदिवासी बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरगाणा तालुक्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्तव केल्याबद्दल कलापथकाचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी ‘वीर एकलव्य आदिवासी सांस्कृतिक कला पथक’ या पथकाला आदिवासी संशोधन संस्था पुणे तसेच ओरिसा सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी कला महोत्सवात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते.

या निमित्ताने आदिवासींच्या रुढी, परंपरा संस्कृतीची ओळख होत असून समाजातील चालीरिती,राहणीमान, रितीरिवाज, देवदेवता, बोलीभाषा, कला संस्कृतिची देवाण घेवाण होत असून आदिवासी मधील अनेक चांगल्या परंपराचा प्रचार व प्रसार होण्यास मदत व्हावी हाच मुळ उद्देश आहे.”
-रतन चौधरी, डांगी भाषा अभ्यासक.

Deshdoot
www.deshdoot.com