कोविड-१९ लढा देण्यास पोलिस विभाग सज्ज : पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग

कोविड-१९ लढा देण्यास पोलिस विभाग सज्ज : पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक  | प्रतिनिधी 

संपूर्ण जगात ‘कोविड १९’ अर्थात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व जग धडपडत आहे. नाशिक जिल्ह्यातही संबंधित सर्व यंत्रणा या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग या एक महिला पोलिस अधिकारी या लढ्यात खंबीरपणे उभ्या आहेत.

त्या आणि त्यांचे अधिकारी दिवसाकाठी तब्बल १२ ते १६ तास काम करीत आहेत. कलम १४४ लागू असल्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळून कोरोनाचा प्रसार होणार नाही याबाबत खबरदारी घेणे, पोलिस अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यंतच्या कामांचे नियोजन करणे, त्यांचेही मनोधैर्य वाढविणे यापासून तर संचारबंदीतही रस्त्यावर उतरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रबोधन करणे या सर्व भूमिका त्या निभावत आहेत. याबाबत डॉ. आरती सिंग यांच्याशी केलेली बातचीत…

प्रश्न : गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे, गुन्हेगारी कमी करणे यापेक्षा कोरोना प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंध करणे यामधील गुंतागंत कशी सोडविली?

उत्तर: गुन्हेगार कोण आहे, त्याची गुन्हा करण्याची पद्धत, त्याची पार्श्वभूमी आदींबाबत आम्ही अभ्यास केलेला असतो. तसे पुरावे समोर असतात. त्यामुळे त्याला जेरबंद करणे तसे फार अवघड नसते. तो सापडल्यावर त्याला शिक्षा करणे, त्याचे प्रबोधन करणे याकडेही आमचे लक्ष असते. मात्र यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. येथे आम्हाला पोलिसी खाक्या दाखविण्यावेक्षा मानवतावादी विचार करून लढा द्यावा लागत आहे.

सोपं सांगायचं म्हणजे ही एक तारेवरची कसरत आहे. सध्या देशभर ‘कलम १४४’ लागू आहे. या कलमाबाबत नागरिकांना समजावून सांगणे, त्यांना एकत्र येण्यास मज्जाव करणे, तरीही लोक रस्त्यावर आले तर त्यांच्यावर कारवाई करणे यातच आमची खूप मेहनत वाया जात आहे. सुदैवाने काही सुजाण नागरिक या कलमाचे तंतोतंत पालन करीत आहेत. त्यामुळे आम्ही पोलिस वाहनावर लाऊड स्पिकर ठेवून अनाउन्समेंट करणे, चौकाचौकात थांबून लोकांना समजावून सांगणे यावर भर दिला आहे. यासाठी काही संस्थाही आम्हाला येवून मिळाल्या आहेत.

प्रश्न : पुणे, मुंबईतून गावाकडे जाणारे मजुरांचे लोंढे कसे थोपविले?

उत्तर : संचारबंदी लागू झाल्यामुळे मोठमोठ्या शहरांतील मजुरांचे खूप हाल झाले. त्यांच्याकडे पैसा आणि निवारा नसल्यामुळे त्यांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले. मात्र यामुळे सगळा गोंधळा उडाला. अनेक जण पायीच गावाकडे निघाले. काही संचारबंदीतही वाहनांनी निघाले. हे सगळे रोखण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी जिल्ह्याची सीमा सील केली. कारण लॉकडाऊनचा अर्थ जी व्यक्ती जेथे आहे तेथेच रहायला हवी.

जेणेकरून हा जो कोरोनाचा संसर्ग आहे त्याचा आणखी फैलाव होणार नाही. त्यामुळे आम्ही पहिले पाऊल उचलले जी व्यक्ती जेथे आहे तेथेच थांबविणे. यासाठी आम्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर २७ चेकपोस्ट उभारले. त्यात गुजरात बॉर्डरचाही समावेश आहे. आमचे अधिकारी, कर्मचारी २४ तास या चेकपोस्टवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येकाची येथे चौकशी होत आहे. त्याची नोंद घेतली जात आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू आहे. तेथे व्हिडिओ शुटिंगही आम्ही करीत आहोत. सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यात आंतरराज्य गुजरात बॉर्डरचाही समावेश आहे.

प्रश्न : जिल्ह्याचा आवाका मोठा आहे. १५ तालुके आहेत. या सगळ्या तालुक्यांमध्ये एकत्रितरीत्या आहे त्या कुमकेच्या सहाय्याने आपण कसे नियोजन केले आहे. त्याबद्दल काय सांगाल?

उत्तर : हे खरेच मोठे चॅलेंज आहे. कारण सगळीकडेच लॉकलाऊन असल्यामुळे आपल्याला इतर जिल्ह्यातूनही पोलिस कुमक मिळणे अवघड आहे. तरी देखील आम्हाला इतर मोठा पोलिस फौजफाटा मिळाला आहे. त्याचे आधी योग्य नियोजन केले. नाशिक ग्रामीण अंतर्गत एकुण ४० पोलीस स्टेशन असून, १ सायबर पोलीस स्टेशन आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकुण ४ हजार पोलीस कार्यरत आहेत. आपल्या जिल्ह्यातील काही मोठे तालुके आणि शहरे आहेत, त्यांच्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. जसे मालेगाव, नांदगाव तालुक्यातील मनमाड, निफाड येथे अधिकचा फौजफाटा उभा केला आहे. येथे गर्दी होण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे आम्ही जनसामान्यांचे प्रबोधन करीत आहोत, की कृपया घराबाहेर पडू नका. त्यामुळे आम्ही लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

प्रश्न : या संचारबंदीत सोशल डिस्टन्सिंग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांनाच लोकांपासून दूर करणे म्हणजे ठराविक अंतरावरून संवाद साधायला सांगणे तसे अवघड, पण तुम्ही हा पेच कसा सोडविला, याबाबत थोडं सांगा?

उत्तर : ज्या गर्दीच्या ठिकाणी आमचे मनुष्यबळ कमी पडत आहे. जसे भाजीबाजार, बाजार समिती, किराणा दुकान अशा ठिकाणांवर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जावा, यासाठी आम्ही काही ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे. त्याद्वारे गर्दी होणाऱ्या या ठिकाणांवर आमचे वॉच आहे.

जर सांगुनही अशा ठिकाणी जर नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील तर गरज पडल्यास आम्ही नागरिकांवर गुन्हाही दाखल करीत आहोत. असे आपण तब्बल १६० गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा दाखल करण्यामागचा हेतू शिक्षा करणे हा नसून लोकांना या परिस्थितीची जाणीव करून देणे हा आहे.

प्रश्न : या संचारबंदीत बऱ्याच अफवांचे पीक आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपले लक्ष आहे का, या अफवा थांबविण्यासाठी कोणली पाऊले उचललीत?

उत्तर : आज सगळेच लोक घरात बसून आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे असलेला मोबाइल हाच करमणुकीचे आणि माहिती जाणून घेण्याचा स्त्रोत झाला आहे. वास्तविक हे खूप चांगले आहे. पण काही लोकं किंवा काही प्रवृत्ती या मोबाइल, सोशल मीडियाचा गैरवापर करतात. काहीही अफवा पसरवितात. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर आमचे लक्ष आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर आम्ही गुन्हेही दाखल केले आहेत. आतापर्यंत असे पाच गुन्हे आम्ही दाखल केले आहेत. जेणेकरून अफवांचा बाजार गरम होणार नाही, लोकं घाबरणार नाहीत.

प्रश्न : मालेगाव शहरात मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. येत्या ८ एप्रिलला त्यांचा शब-ए-बरात हा सोहळा आहे. तो थांबविण्यासाठी काय प्रबोधन केले?

उत्तर : शब-ए-बरातच्या दिवशी मुस्लिम नागरिक त्यांच्या कब्रस्थानात जमा होतात. पूर्वजांचे स्मरण करतात, नमाज पठण करतात आणि नंतर भिकाऱ्यांना मदत करतात. मात्र यावेळी संचारबंदी असल्यामुळे आम्ही त्यांचे प्रबोधन केले. त्यांचे मौलाना, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून त्यांना यावेळी घरी बसूनच नमाज पठण करण्याची विनंती केली आहे. त्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य केले आहे. त्यामुळे त्याबाबत आता काही काळजीचे कारण नाही.

प्रश्न : पोलिसही माणूसच आहे. त्यालाही परिवार आहे. त्यांचे मनोधैर्य आपण या कठीण समयी कसे वाढवित आहात?

उत्तर : पोलिसाच्या अंगावर खाकी वर्दी असली, त्याला विशेष अधिकार असले तरी तो एक माणूस आहे. त्याला परिवार आहे. मात्र अशा कठीण प्रसंगी हाच पोलिस आज अहोरात्र जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी २४-२४ तास काम करीत आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांच्या कामांच्या वेळा ठरवून दिल्या आहेत.

त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देतो. आमचे पोलिसही खंबीर आहेत. आमचाही परिवार आहे. आम्ही घरून निघताना आम्हालाही एक विनवणी ऐकू येते, ‘नका ना जाऊ ऑफिस, थांबा ना आजच्या दिवस घरी.’ पण आम्हाला अशावेळी भावनिक होवून कसे चालणार. आम्ही तुमच्यासाठी बाहेर पडतो. पण तुम्ही घरी थांबा. तुम्ही सहकार्य केले तरच आम्ही, तुम्ही आणि अखेरीस आपण सारे यशस्वी होऊ, असा संदेश आम्हाला यातून द्यायचा आहे. सहकार्य करा, घरीच थांबा, कुटुंबासोबत थांबा आणि निरोगी राहा.

  • मोहिनी राणे- देसले, माहिती अधिकारी, नाशिक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com