एसटी एलएनजीवर धावण्यायोग्य करणे अव्यवहार्य! ; प्रकल्पच होऊ शकतो रद्द
स्थानिक बातम्या

एसटी एलएनजीवर धावण्यायोग्य करणे अव्यवहार्य! ; प्रकल्पच होऊ शकतो रद्द

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । नैसर्गिक वायूवर (एलएनजी) धावणार्‍या एसटी बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. महामंडळाच्या बस गाड्यांच्या डिझेलवरील यंत्रणेत बदल करून गॅसकीट बसवून त्या एलएनजीवर धावण्यायोग्य करणे, हे अव्यवहार्य ठरणार असल्याचे आता बोलले जात असून नवीन वातानुकूलित गाड्यांमधील डिझेल यंत्रणेचे एलएनजीमध्ये परिवर्तन करणे हे अधिक खर्चिक आहे.

घाट आणि महामार्गावर एलएनजीवरील वाहनांच्या वेगाला डिझेलच्या तुलनेत मर्यादा येते. या कारणांमुळे एलएनजी एसटीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एसटीतील साध्या गाड्या या 8 ते 10 वर्षे जुन्या झाल्या असून, अशा गाड्यांमधील इंधन यंत्रणेत बदल केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आठ महिन्यांपासून एलएनजी एसटीबाबत अंमलबजावणीचा पेच कायम आहे. हा प्रकल्पच रद्द होण्याची शक्यता आहे.
कमी झालेल्या प्रवासी संख्येमुळे एसटीच्या संचित तोट्यात वाढ होत आहे.

त्यातच डिझेल दरवाढीमुळे होणारा तोटा रोखण्यासाठी एसटी बसगाड्या एलएनजीवर चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. महामंडळातील 250 आगारांमध्ये रोज सुमारे 12 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. महामंडळातील एकूण खर्चापैकी सुमारे 37 टक्के खर्च हा डिझेलवर होतो. एसटी ताफ्यातील बहुतांश साध्या गाड्या 8 ते 10 वर्षांहून अधिक जुन्या आहेत.

वाढते वायुप्रदूषण आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च लक्षात घेता डिझेलवरील एसटी गाड्या एलएनजीवर चालवण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मार्चमध्ये घेतला. त्यावेळी राज्यातील एसटी आगारांच्या ठिकाणी एलएनजी पंप उभारण्यासाठी केंद्रात बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. डिझेलवरील गाड्या एलएनजीवर सुरू केल्यास महामंडळाची सुमारे 1 हजार कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता होती. सध्या या प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com