Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपारावरच्या गप्पा : गड्या, आपला गावचं बरा…

पारावरच्या गप्पा : गड्या, आपला गावचं बरा…

(गावातली काही शहाणी मंडळी अन पोर बसलेली)

दाम्या : (मोठ्याने आवाज देत ) अय संत्या आर इकडे ये .. (संत्या तिकडून पारावर येतो)
रंग्या : काय संत्या, भावा कधी आलास मंबईवरन?
संत्या : रातीच आलुया,
दाम्या : असं अचानक ? माग तर येऊन गेला ?
संत्या : आता कायमचा आलुय म्या

- Advertisement -

पाटलाच्या तुक्या : कार संत्या, काय झालं, मंबईला चांगलं हाय कि, काम बी मिळतंय अन पैसाबी?
संत्या : कसलं काय तात्या? नुसती मरमर हाय तिथं? पैसा लय पण सुख न्हाय…
पाटलाच्या तुक्या : पैसा कमवायचा म्हटलं कि मरमर आलीच पर तू एवढी वर्ष काढली अन आता काय झालं?
संत्या : तात्या, तिथली माणसं, वातावरण, जगणं न्हाय सहन होत आता.. आपल्या जीवाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही तिथं .. सुरक्षितता हरवत चाललिया.. त्यामुळे गाव गाठला..आता इथंच जगायचं.. माणसांबरोबर

तान्या : म्या त लय ऐकलं व्हतं , मंबईबद्दल , लय भारी हाय म्हण, मोठं मोठ्या इमारती तिथली गर्दी (संत्या त्याला मध्येच तोडत )
संत्या : तान्या , फकस्त हे ऐकायला चांगल वाटतंय.. नुसती गर्दी पण माणूस कुठंच न्हाय? इमारती भल्यामोठ्या पण मन मात्र लहान.. कुणालाच कुणाचं देणंघेणं नाही.. आर साधं शेजारच्या घरात भांडण झालं तर कोणी येत न्हाय.. गावाकडं तस न्हाय..
पाटलाच्या तुक्या : खरं हाय, गावाकडं दुसऱ्या घरी पाहूणा आला तरी आपण आधी चहा-पाणी करतो… गावाकडं गर्दी नसते पण माणसं अधिक भेटत्यात… दाम्या : गावाकडं एखादी घटना घडली तरी अख्खा गाव जमा होतोय, पण शहरात मात्र कुणाचाच भरवसा देता येत न्हाय?

सम्या : अगदी खरं हाय, आता हैदराबादची घटनाचा बघाना… देशाला काळिमा फासणारी घटना हाय.. शहर सुरक्षित राहिली न्हाय.. त्या ठिकाणी कुणीबी त्या मुलीचा जीव वाचवायला आलं न्हाय..
पाटलाच्या तुक्या : व्हय, पण गावाकडं एखाद्याची मौत झाली तरी कोणाच्या घरी चूल पेटत न्हाय.. भांड्याला भांड लागलं तरी आवाज होत न्हाय.. गाव समद्याच बाबतीत अजूनही बरा आहे.. बरं केलंस संत्या निघून आलास ते? पर शहराला नाव ठेऊन चालणार न्हाय? आपलाच देश हाय…यासाठी आपणच माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे….

संत्या : बरोबर तात्या, शहर वाहवत चाललेत… गाव अजूनही माणसात आहे.. त्यामुळे गावावरच शेती करणार हाय म्या.. पोराबाळांना गावातली माणुसकी शिकवणार हाय..
पाटलाच्या तुक्या : व्हय तर… आपल्याला गावाबरुबर शहर सुधारावयाची हायीत…लय मोठं काम हाय पर.. गोड बोलल्याने मोठमोठीं काम झटपट व्हत्यात..उगाच गांधी म्हटले न्हाय ‘खेड्याकडे चला’ म्हणून….. (चला घराकडे)

- Advertisment -

ताज्या बातम्या