वादविवाद स्पर्धेत अक्षदाची बाजी
स्थानिक बातम्या

वादविवाद स्पर्धेत अक्षदाची बाजी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस रेझिंग डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेत शिकणार्‍या अक्षदा माधव देशपांडे हिने प्रथम पुरस्कार पटकावला.

‘महिलांना सुरक्षित वातावरणासाठी कायद्यापेक्षा सामाजिक बदल गरजेचा’ हा विषय देण्यात आला होता. ही स्पर्धा बीवायके महाविद्यालयात पार पडली.

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘कायद्याची सक्ती हवी की, सामाजिक बदल हवे’ या विषयावर अक्षदाने दुसर्‍या टप्प्यात झालेल्या स्पर्धेत आपले विचार मांडले होते. ही स्पर्धा पोलीस आयुक्तालय कार्यालयात घेण्यात आली होती. त्यात देखील तिला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

यानंतर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या विभागीय स्तरावर झालेल्या तिसर्‍या टप्प्यात वादविवाद स्पर्धेत अक्षदाने अमलीपदार्थ सेवन नियंत्रणात आणण्यासाठी कायद्याची सक्ती हवेत की, सामाजिक बदल हवेत याविषयावर विचार मांडले.

त्यात देखील तिला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात मुंबई येथे 8 जानेवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत तिने नाशिक पोलीस महापरिक्षेत्राचे प्रतिनिधित्व केले.

या स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडिया लक्ष विचलित करणारी धोकादायक बाब’ असा होता. राज्यातून नाशिक परिक्षेत्राला वादविवाद स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अक्षदा देशपांडे हिला 10 किलो चांदीची फिरती सांघिक ढाल देऊन तिचा गौरव करण्यात आला. तसेच तिला वैयक्तिक स्तरावर राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट युवा वक्ता म्हणून सन्मानित करण्यात आले.

तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य दालनात प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य एस. डी. कुलकर्णी ,पर्यवेक्षक जे. एस. भावसार, मराठी विषयाच्या शिक्षिका एस. एस. कुलकर्णी, यू. एस. कुलकर्णी, अक्षदाचे वडील माधव देशपांडे, आई मानसी देशपांडे उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com