दुगावला गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच लाखाचे रसायण व साहित्य जप्त
स्थानिक बातम्या

दुगावला गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच लाखाचे रसायण व साहित्य जप्त

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

file photo

नाशिक । प्रतिनिधी

दुगाव (ता. नाशिक) परिसरात एका शेतातील घरावर छापा टाकून ग्रामिण पोलीसांनी गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला. यामध्ये पोलीसांनी 5 लाख 11 हजार रूपयांचे रसायन तसेच साहित्य जप्त केले. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.

दिपक रामभाऊ कराडे (39, रा. लक्ष्मणनगर, पेठरोड), दिलीप वामन आल्हाटे (51, रा. साफल्य सोसायटी, पेठरोड, पंचवटी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर खुशाल प्रकाश चौधरी (रा. दुगाव, ता. जि. नाशिक), नागेश रमेश जाधव (रा. पालिकानगर झोपडपट्टी, पेठरोड), शिवा सदाशिव जाधव (रा.लक्ष्मणनगर झोपडपट्टी, पेठरोड) व अक्षय पुर्ण नाव पत्ता नाही. हे गुन्हा दाखल झालेले चौघे संशयित फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुगाव परिसरातील एका शेतातील घरात नाशिक येथील काही लोक गावठी दारू गाळत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधिक्षक भिमाशंकर ढोले यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक एस.एस. सपकाळे व त्यांच्या पथकाने शनिवारी (दि.25) दुपारी 3 वाजेच्या सुमारास दुगाव शिवारातील कुसुम सोना वाघ यांच्या शेतातील घरावर छापा टाकला.

यावेळी सर्व संशयित संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत गावठी दारू तयार करताना आढळून आले. पोलीस आल्याची माहिती कळताच सगळ्यांनी तेथून पळ काढला. पोलीसांनी पाठलाग करत तसेच माहिती घेऊन नाशिक येथील दोघांना अटक केली.

या ठिकाणी गावठी दारी, दारू बनविण्यासाठीचे रसायण, 4 गॅस सिलिंडर, शेगड्या तसेच इतर साहित्य व अ‍ॅपे रिक्षा असे एकुण 5 लाख 11 हजार 50 रूपयांचे साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी संशयितांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, जीवनावश्यक वस्तु कायदा, दारूबंदी अधिनियम यासह विविध कलामांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय पोलीस निरिक्षक बी. बी. पाटील करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com