नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान बनवणार २५ हजार मास्क

नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान बनवणार २५ हजार मास्क

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 25 हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. खासगी संस्थेने ही ऑर्डर दिली आहे.

कारागृहात दहा कारखाने असून त्यामध्ये सुतारकाम, लोहारकाम, मूर्तीकाम, विणकाम, रसायन आदींचा समावेश आहे. त्यापासून कारागृहाला दरवर्षी सहा कोटींवर महसूल मिळतो. करोनामुळे बाजारात मास्कची मोठी टंचाई असल्याने जास्त दराने मास्क विक्री होत आहे. गरजूंना मास्क उपलब्ध व्हावेत म्हणून एका संस्थेने कारागृहाला 25 हजार मास्कची ऑर्डर दिली असून दहा बंदी हे काम करत आहेत.

कारागृहात तीन हजार बंदी असून चारशे अधिकारी व सेवक आहेत. त्यांनाही प्रशासनाने मास्क वाटून ते लावण्याचे आदेश दिले आहेत. कैदी व सेवकांनी करोना टाळण्यासाठी काय करावे व करू नये याची प्रत्येक बराकीत पत्रके लावण्यात आली आहेत.

बाहेरून सेवक किंवा अन्य व्यक्तीला कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी साबणाने हात धुवावे लागतात. कारागृहाचे डॉ. सचिन कुमावत, डॉ. ससाणे हे त्यांची आरोग्य तपासणी करतात. प्रत्येक कैदी, सेवक व अधिकार्‍याचे दररोज तापमान घेतले जात आहे. कैद्यांनी एकाच ठिकाणी थांबू नये म्हणून कामानंतर ग्रंथालयात, कॅरम, व्हॉलीबाल, बुद्धिबळ खेळण्यासाठी पाठवले जात आहे. कॅन्टिनची सुविधा देण्यात आली आहे. महापालिकेच्या सेवकांना बोलावून कारागृहात औषध फवारणी करण्यात आली आहे.

करोनासारख्या विषाणूची लागण एका कैद्याला झाली तरी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथे कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या जिल्ह्यातील कैद्यांचाच स्वीकार सुरू केला आहे. बाहेरच्या कैद्यांना संबंधित जिल्हा कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. नाशिकमधून आलेल्या कैद्यांची प्रथम जिल्हा रुग्णालयात तपासणी होते. मग कारागृहातील करोना वॉर्डात पंधरा दिवस स्वतंत्र ठेवले जाते.

कारागृहाची क्षमता दीड हजार असताना तीन हजार कैदी झाले आहेत. गर्दी कमी करण्यासाठी जामीनपात्र कच्च्या कैद्यांना त्वरित जामिनावर सोडण्याची विनंती कारागृहाने कोर्टाला केली आहे. कैद्यांना कोर्टात न नेता व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारा सुनावणी घेतली जात आहे.

कैद्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून दररोज सुमारे पाचशे नातेवाईक येतात. करोनामुळे त्यांना तसेच कैद्यांच्या वकिलांना 31 मार्चपर्यंत येथे बंदी आहे. कैद्यांसाठी दररोज बाहेरच्या संस्था सत्संग घेतात. तो सध्या बंद आहे. कैदी आणि सेवक यांना साडेतीन हजार मास्कचे वाटप झाले असून प्रत्येकाला मास्क सक्तीचा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com