Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक६२ वर्षांनंतर दंडे हनुमान चौकात पुन्हा रहाडीचा आनंद

६२ वर्षांनंतर दंडे हनुमान चौकात पुन्हा रहाडीचा आनंद

नाशिक । प्रतिनिधी

कार्यकर्त्यांची संख्या घटली, रहाडीचा खर्च निघेनासा झाला. तसेच रंगपंचमीच्या काळातच मानाच्या व्यक्तींचे निधन झाले यामूळे गेल्या अनेक वर्षांपासून दंडे हनुमान चौकातील रहाड असूनही बंद स्वरुपात होती. मात्र, यंदा दंडे हनुमान मित्र मंडळाच्या पुढाकाराने यावर्षी पहिल्यांदाच ही रहाड खोदण्यात आली असून या राहाडीमूळे आता नाशिकमध्ये एकुण पाच रहाडींवर रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

शहरातील काजिपुरा पोलीस चौकी परिसरात तीनशे वर्षांपुर्वीची पेशवेकालीन रहाड आहे. असे म्हणतात की, ही रहाड बांधली गेली तेव्हा नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी गोपिकाबाई पेशवे यांचे याठिकाणी वास्तव्य होते. त्यामूळे या रहाडीला विशेष महत्त्व आहे. सध्या या रहाडीची हैयैया कलाल समाज आणि क्षत्रिय समाजाकडे धुरा आहे. ही एक पौराणिक काळातील रहाड आहे.

विविध जातीधर्माचे लोक याठिकाणी रंगपंचमीला गुण्यागोविंदाने नांदावेत यासाठी याठिकाणची रहाड महत्त्वपुर्ण असल्याचे येथील जुणे जाणकार सांगतात.

1958 सालापुर्वी बैलगाडीवर मोठमोठाले टिप, पाण्याच्या टाक्या ठेवून रंगपंचमी साजरी व्हायची. कालांतराने कार्यकर्ते कमी झाले, निधीची कमतरता भासू लागल्याने येथील राहाड खोदणे बंद पडले. कालांतराने येथील परंपरा मोडकळीस आली होती. मात्र, तब्बल 62 वर्षांनी पुन्हा एकदा ही राहाड खोदण्यात आली आहे. महिलांची विशेष काळजी याप्रसंगी घेतली जाणार असल्याची माहिती दंडे हनुमान मित्र मंडळाचे सर्वेसर्वा आणि नाशिवक महापालिकेचे नगरसेवक गजानन शेलार यांनी दिली.

पुर्वी रहाड खोदण्याच्या आधी मनोभावे पुजाअर्चा पार पडत असे. मंडप टाकून याठिकाणी भाविकांना बसण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जायची. फुले, झाडाच्या फांद्या व इतर वस्तूंनी रहाडीला सजविले जायचे. त्यांनंतर राहाड खोदण्यास प्रारंभ होत असे अशी माहिती जुने जाणकार स्थानिक मधुकर शिरसाठ या 65 वर्षींय आजोबांनी दिली. हैयय्या कलाल समाजातील 84 वर्षांच्या माणिकलाल राय यांनी सांगितले की, रहाड उघडण्यापूर्वी हा समुदाय धार्मिक सोहळा आयोजित करत असे.

पूजा अर्चना करून लोक देवाला बकरा किंवा कोंबड्याचा बळी देत असत अशी प्रथा होती. उत्सवाच्या एक दिवस अगोदर एक समुदायाकडून ही मेजवानी असे. गेल्या काही वर्षांपुर्वी एका पुजार्‍याचे निधन याच काळात झाल्याने येथील रहाड बंद ठेवण्यात आली होती. त्यांनतर पुढील वर्षी पुन्हा समाजातील महत्त्वाची व्यक्ती दगावली. यामूळे राहाड बंद ठेवली. त्यानंतर राहाड कायमचीच बंद झाल्याचे येथील जाणकार सांगतात.

येथील रहाड 12 बाय 12 फुट आकाराची असून जवळपास 10 फूट खोल आहे. भिंतीच्या प्रत्येक बाजूला पाय ठेवण्यासाठी राहाडचे एक कपाट तयार केलेले आहे. दंडे हनुमान मित्रमंडळात रहाडच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. या ग्रुपने रहाडमध्ये नैसर्गिकरित्या बनवलेल्या रंगाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी दांडे हनुमान मित्र मंडळाची उत्सव साजरा करण्याची एक अनोखी कल्पना असते, म्हणूनच यावर्षीच्या उत्सवासाठी आम्ही ऐतिहासिक रहाडचा कायाकल्प करून नवी ओळख या रहाडीची अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.

येथील रहाडीचे वैशिष्ट्य

यंदापासून या रहाडीमध्ये नैसर्गिक निर्मिती केलेला पिवळा रंग तयार करण्यात येणार आहे. ही या रहाडीची नवी ओळख असून कुठलाही रासायनिक रंग यात टाकला जाणार नाही. जवळपासून 200 ते 300 किलो वजनाचे विविध प्रकारे पिवळे फुलं एकत्र करून ते उकळवून रंग तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी महिलांंना रंगपंचमी खेळण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.

आदर्श रंगपंचमी ठरणार

गेल्या अनेक वर्षांपासून होळीचा रंग येथील जनतेने अनुभवला नव्हता. यंदापासून पुन्हा एकदा रंगपंचमी सुरु होणार असल्याचे आनंदाचे वातावरण आहे. याठिकाणी विविध जातीधर्माचे नागरीक वास्तव्यास आहेत. विविध जातीधर्माच्या नागरीकांची अनोखी रंगपंचमी ठरावी यासाठी प्रयत्न असणार आहे.

गजानन शेलार, नगरसेवक, नाशिक मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या