Friday, April 26, 2024
Homeनाशिकनायगावला युनियन बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला; तिजोरीला हात लावताच सायरन वाजल्याने चोरटे पसार

नायगावला युनियन बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला; तिजोरीला हात लावताच सायरन वाजल्याने चोरटे पसार

सिन्नर | वार्ताहर 

खिडकीचे गज कापून दरोडा घालण्याच्या उद्देशाने बँकेत प्रवेश करत तिजोरीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सायरनच्या आवाजाने फसल्याची घटना आज दि.13 पहाटे तालुक्यातील नायगाव येथे घडली.

- Advertisement -

नायगाव येथे युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा असून दोघा अज्ञात तरुणांनी दरोडा घालण्याच्या तयारीने बँकेत खिडकीचे गज कापून प्रवेश केला. ते आत आल्यापासूनचा संपूर्ण प्रकार 20 मिनिटे सीसीटीव्हीत कैद झाला असून विविध केबिनची झडती घेत ते स्ट्राँगरूम पर्यंत पोहोचले.

तेथे असणाऱ्या तिजोरीला त्यांनी हात लावताच  चोरी प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित झाल्या. सुरक्षेसाठी असणारा सायरन मोठ्याने वाजू लागल्यावर या दोघा चोरट्यांची धांदल उडाली. कार्यभाग अर्ध्यावर सोडून ते दोघेही आल्या मार्गाने बाहेर पडले व बाजूलाच अंधारात उभ्या
केलेल्या दुचाकीवरून पसार झाले. गज कापून आत प्रवेश करण्यासाठी वापलेली हत्यारे देखील त्यांनी जाताना सोबत नेली.

सायरनच्या आवाजाने परिसरातील रहिवाशी जागे झाले. सर्वांनी बँकेकडे धाव घेतली मात्र चोरटे पसार झाले होते. बँकेच्या व्यवस्थापकांना याबाबत कळवण्यात आल्यावर त्यांनी तातडीने शाखेकडे धाव घेतली.

तोपर्यंत एमआयडीसी पोलिसांचे गस्ती वाहन देखील घटनास्थळी पोहोचले होते. बँक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या समक्ष पोलिसांनी आत प्रवेश करत घडल्या प्रकाराची पाहणी केली. माहितीसाठी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान हा प्रकार समजल्यावर दिवसभरात  ग्राहकांनी बँकेत येत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. सकाळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या