टोलनाक्यावरील सवलतींसाठी करावी लागणार नोंदणी; स्थानिक वाहनधारकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र मार्गिकांचे नियोजन 

टोलनाक्यावरील सवलतींसाठी करावी लागणार नोंदणी; स्थानिक वाहनधारकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र मार्गिकांचे नियोजन 

नाशिक । अजित देसाई 

येत्या १५ डिसेंबरपासून देशातील सर्वच टोलनाक्यावरून फास्टटॅग द्वारे टोल आकारणी करण्यात येणार आहे. यासाठी टोलनाक्यावरील सर्वच मार्गिका कॅशलेस असणार आहेत. असे असले तरी टोलनाक्यांच्या परिसरसातील २० किमी त्रिज्येत येणाऱ्या गावांतील वाहनधारकांसाठी स्थानिक वाहने म्हणून देण्यात येणाऱ्या सवलती सुरु ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर विशेष नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ही वाहने फास्टटॅग प्रणालीद्वारे कॅशलेस मार्गिकांचा अवलंब करून निर्धारित सवलतींचा लाभ घेऊ शकणार आहेत.

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने दि. १ डिसेंबरपासुन सर्वच टोलनाक्यावर फास्टटॅग द्वारे वाहनांना टोल भरणे सक्तीचे केले आहे. मात्र या निर्णयाला दोन आठवडे स्थगिती देत दि.१५ डिसेंबर पासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. टोलनाक्यावर पैसे भरण्यासाठीचा वेळ वाचावा या हेतूने फास्टटॅगचा पर्याय सर्वच वाहनांसाठी वापरला जाणार आहे.

या निर्णयामुळे टोलनाक्यावर दिसणाऱ्या वाहनांच्या लांबचलांब रांगा यापुढे बघायला मिळणार नाही. टोलनाक्यावर वेग काहीसा कमी करून वाहन न थांबता पुढे निघून जाईल व या अवघ्या काही सेकंदाच्या वेळेत डिजिटल तंत्रज्ञानाने तुमच्या वाहनाचा टोल भरला गेल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त होईल अशी ही प्रक्रिया असणार आहे. फास्टटॅगद्वारे टोल चुकता होणार असला तरी टोलनाक्याच्या परिसरातील स्थानिक वाहनधारकांना  दिल्या जाणाऱ्या सवलतीचे काय हा प्रश्न उभा राहिला आहे.

आज जिल्ह्यातील मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव, चांदवड येथील टोलनाक्यावरून २० किमीच्या आतील वाहनांना स्थानिक म्हणून सवलत असून त्यांना कोणतेही शुल्क न भरता जाण्यायेण्यास मुभा आहे.

अर्थात यासाठी संबंधित टोल प्रशासनाकडून स्थानिक म्हणून या वाहनांची नोंद करण्यात आली आहे. तर इगतपुरी येथील टोल प्लाझावर मात्र स्थानिक वाहने म्हणून देण्यात येणारी निःशुल्क सवलत काढून घेण्यात आल्याने व स्थानिक म्हणून गणल्या जाणाऱ्या वाहनांसाठी ठराविक शुल्क आकारणी करण्यात येत असल्याने नाराजीचा सूर आहे.

नाशिक पुणे महामार्गावर असणाऱ्या शिंदे येथील टोल प्लाझावर देखील २० किमी परिसरातील वाहनांना स्थानिक म्हणून निम्मी सवलत देण्यात येत आहे. इगतपुरी व शिंदे येथील टोल नाक्यावर  चांदवड, पिंपळगाव प्रमाणे स्थानिक वाहनांना निःशुल्क सवलत मिळावी हि मागणी होत असताना आता फास्टटॅगचे लफडे वाढल्याने स्थानिक वाहनधारकांच्या संतापात अधिकची भर पडली आहे.

येत्या दोन दिवसांत फास्ट टॅग चा वापर करून टोल भरणे अनिवार्य झाल्यावर शिंदे व ईगतपुरीतील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांचा गोंधळ उडणार असला तरी स्थानिक म्हणून या दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या सवलती कायम राहतील असते टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक वाहन म्हणून असणारी सवलत यापुढेदेखील कायम असणार आहे.

मात्र त्यासाठी टोलनाक्यावरील यंत्रणेकडे आवश्यक पुरावे देऊन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. अशी नोंदणी केलेले वाहन टोलनाका ओलांडत असताना स्थानिक म्हणून मिळणाऱ्या सवलतीच्या दरानुसारच फास्टटॅगद्वारे आकारणीस पात्र राहील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पिंपळगावला २० हजार स्थानिक वाहनांची नोंदणी 

पिंपळगाव टोलनाक्याच्या परिसरातील २० किमी त्रिज्येत असणाऱ्या गावांमधील वाहनांना स्थानिक म्हणून सवलत देण्यात आली आहे. या वाहनांची टोलनाक्यावर नोंदणी करण्यात आली असून सुमारे २० हजार वाहनधारकाना वर्षभरापूर्वीच फास्टटॅग देण्यात आले आहेत. या वाहनांना टोल माफ असला तरी फास्टटॅग प्रणालीत त्यापद्धतीने मोड ठेवण्यात आला आहे.

त्यानुसार सदर वाहन ईटीसी मार्गिकेतून विनासायास व न थांबता मार्गक्रमण करू शकते अशी माहिती न्हाई ( राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) चे शशांक आडके यांनी दिली. इगतपुरी संदर्भात त्यांनी सांगितले की, वडपे ते गोंदे प्रोजेक्ट अंतर्गत असणाऱ्या इगतपुरी येथील तोल नाक्यावरून या पूर्वी स्थानिक वाहनांसाठी टोल आकारणी नव्हती. मात्र सुधारित नियमावलीनुसार आता स्थानिक वाहनांना इतर वाहनांच्या तुलनेत १२.५० टक्के इतका टोल भरावा लागणार आहे.

याचा अर्थ स्थानिक जीप अथवा कारला साधारणपणे १५ इतका टोल भरावा लागेल. इगतपुरीतील वाहनधारकांना स्थानिक म्हणून सवलत मिळवण्यासाठी वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी वाहनमालकाचे आधारकार्ड, वाहनाचे आरसी बुक सादर करावे लागेल. त्यावरून सदर वाहन स्थानिक असल्याची खातरजमा करण्यात येईल व फास्टटॅगच्या मोडवर त्या वाहनाचा तसा उल्लेख केला जाईल असे आडके यांनी नमूद केले.

शिंदे टोलनाक्यावर देखील नोंदणीची व्यवस्था 

पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोलनाक्यावर २० किमीच्या परिसरातील वाहनांसाठी स्थानिक म्हणून सवलत आहे. हा टोलनाका सुरु झाल्यावर नियमित स्थानिक वाहनधारकांना मासिक पासेस देण्यात आले होते. याआधारे टोलनाक्यावर अशा वाहनांची यादी उपलब्ध आहे.

फास्टटॅग अनिवार्य झाल्यावर स्थानिक म्हणून नोंदणी असणाऱ्या वाहनासाठी पूर्वीचीच सवलत लागू राहील. तर ज्या वाहनधारकांनी या सवलतीसाठी वाहनाचे आरसी बुक व मालकाचे आधारकार्ड सादर करून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन टोल प्लाझा चे व्यवस्थापक विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

१५ डिसेंबर पासून सर्व मार्गिका फास्टटॅग मोडवर सुरु होतील तर एक किंवा दोन मार्गिका फास्टटॅग नसणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. वाहनाची नोंदणी करताना वाहनमालकाचा आरसी बुक आणि आधार वरील पत्ता एकच असणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com