दुर्दैवी : वेळेवर उपचार न मिळाल्याने आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

दुर्दैवी : वेळेवर उपचार न मिळाल्याने आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

सटाणा | प्रतिनिधी 

राज्य स्काउट आणि गाइडच्या माजी राज्य आयुक्त आणि आदर्श शिक्षिका विजया नारायण देवरे (वय ६२) यांना वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. एकीकडे करोनासारख्या गंभीर समस्येशी सामान्य जनता संघर्ष करीत असताना किमान इतर आजारांबाबत डॉक्टरांनी जनमाणसाला दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मविप्र संस्थेतील येथिल सेवानिवृत्त शिक्षिका देवरे दाढेवरील कृत्रिम कॅप तुटल्यामुळे चार दिवसांपासून दात व दाढदुखीने त्रस्त होत्या. शहरातील दातांचे दवाखाने कोरोनामुळे बंद असल्यामुळे त्यांना उपचार मिळू शकले नाहीत.

परिणामी, त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना येथील एका एमडी डॉक्‍टरांकडे नेण्यात आले. मात्र, त्यांनी देवरे यांना नाशिकच्या एका मोठ्या हॉस्पिटलला चिठ्ठी देऊन तेथे हलविण्याचा सल्ला दिला.

त्या हॉस्पिटलमध्ये नेले असता, तेथेही एक तास बाहेरच ताटकळत ठेवून केवळ सटाणा येथील कंटेन्मेंट झोनमधील रुग्ण असल्याने त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. नाशिकमधील इतर मोठ्या हॉस्पिटलमध्येही हाच अनुभव देवरे कुटुंबीयांना आला.

शहरातील एमडी डॉक्‍टरने जर देवरे दाखल करून तात्काळ उपचार केले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते असे मत व्यक्त करीत नंतर नाशिकलाही खासगी हॉस्पिटलने दाखल न करून घेतल्याने श्रीमती देवरे यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला, असा आरोप देवरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

नंतर त्यांच्या जावयाच्या एका डॉक्‍टर मित्राने आपल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. मात्र, त्यांना ऑक्‍सिजन देणे गरजेचे असल्याने व तेथे ती सोय नसल्याने रुग्णाला इतरत्र हलविण्यास सांगण्यात आले.

रात्री नाइलाजास्तव देवरे परिवाराने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, इतर उपचार न करता त्यांना कोरोना विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांस विलंब झाल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

समाजामध्ये डॉक्टरांना परमेश्वराचे रुप मानले जाते.परंतु अडचणीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याऐवजी रुग्णाची हेळसांड होत असेल,तर हे माणूसपणाचे अपयश आहे.

– श्री .एन.सी.देवरे
(श्रीमती देवरे यांचे पती व मविप्र संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com