
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड महिना मद्याची दुकाने बंद होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सामाजिक अंतर ठेवून आणि राज्य उत्पादन शुल्कच्या निर्देशानुसार नियम पाळत सध्या मद्याची विक्री केली जात आहे.
असे असताना तळीरामांना आणखी दिलासा मिळाला असून आता घरपोच मद्याची सेवा दुकानदारांकडून देण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे रांगेत उभे न राहताही तळीरामांना मद्य उपलब्ध होणार आहे.
आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंग यांनी आदेश काढले असून यामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरीट, बियर, सौम्य मद्य व वाईनची विक्री परवानाधारकास थेट ग्राहकाच्या निवासी पत्त्यावर घरपोच देण्याची अनुमती देण्यात आली आहे.