Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : ग्राऊंड रिपोर्ट : शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीचा आधार; वावी प्रकल्पातून...

Video : ग्राऊंड रिपोर्ट : शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीचा आधार; वावी प्रकल्पातून दिवसाकाठी 2100 युनिटची विजनिर्मिती

सिन्नर । अजित देसाई

दिवसेंदिवस ऊर्जेची गरज वाढती असल्याने व वापर देखील अनिवार्य असल्याने मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ बसवणे अवघड बनले आहे. राज्याला भारनियमनमुक्त करण्यासाठी इतर ऊर्जास्त्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे. राज्यात उर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी 30 टक्के उर्जेचा वापर होतो. राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यादृष्टीने शासन स्तरावर नेहमी प्रयत्न होत असतात. शेतकरी आणि शेती केंद्रबिंदू मानून त्यातूनच सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापराला अलीकडे प्रोत्साहन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जून 2017 मध्ये आणलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरली आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे अशा ठिकाणच्या कृषी वाहिनीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे त्यामुळे पारंपारिक उर्जेची बचत होण्यास मदत होईल हा उद्देश मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा राहिला आहे. याच योजनेतून महावितरणच्या वावी ( सिन्नर) येथील पावणेदोन एकर जागेत सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चातून उभा राहिलेला सौर ऊर्जा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

ईईएसएल या खाजगी आणि सीईएल या केंद्र सरकारच्या मालकीच्या दोन कंपन्यांनी एकत्र येउन हा प्रकल्प साकारला आहे. दिवसाच्या वेळी या प्रकल्पातून तयार होणारी सुमारे 2100 ते 2500 युनिट वीज महावितरणच्या यंत्रणेमार्फत शेतीवाहिनीला जोडण्यात आलीय आहे. यामुळे कृषी पंपांना दिवसा कमी -अधिक दाबाने होणारा वीजपुरवठा नियंत्रित दाबाने होत आहे. सरकरी आणि खाजगी कंपन्यांनी एकत्र येउन उभ्या केलेल्या या प्रकल्पातून मिळणारी वीज शेतीवापरासाठीच उपलब्ध करून दिली जात आहे.

महावितरणच्या 11 केव्ही क्षमतेच्या वावी येथील वीजकेंद्राच्या परिसरातच हा सौरऊर्जा प्रकल्प उभा राहिला असून याखेरीज लासलगाव, गिरणारे व वणी येथे देखील याच पद्धतीने उभारण्यात आलेल्या प्रकल्पातून कृषी वाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. वावी येथील प्रकल्पात 1630 सोलर पँनल लावण्यात आले आहेत. त्यातील प्रत्येक पॅनल दिवसाकाठी 315 वॅट ऊर्जा निर्मिती करतो. हि ऊर्जा लगतच्या 710 केव्हीए क्षमतेच्या इन्व्हर्टर मध्ये साठवली जाते.

 फोटो व्हिडीओ : दिनेश सोनवणे

या ठिकाणी साठवल्या जाणाऱ्या ऊर्जेचा दाब 380 व्होल्ट इतका असतो. मात्र तो विद्युतभारित केल्यावर 11 हजार व्होल्ट इतक्या उच्च क्षमतेने महावितरणच्या प्रणालीला जोडला जातो. तेथून निर्दिष्ठ केलेल्या कृषी वाहिनीला या उत्पादित विजेचा पुरवठा करण्यात येतो. वावी वीज केंद्रांन्तर्गत दुशिंगवाडी फिडर हे कृषी फिडर म्हणून कार्यान्वित आहे.

या फिडरवर जवळपास सातशे जोडण्या या कृषी पंपांच्या आहेत. घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची संख्या या फिडरवर तुलनेने कमीच आहे. त्यामुळे सौरऊर्जेतून मिळणारी वीज या फिडरला जोडण्यात आली आहे.

दिवसभर होणारा सौरविजेचा पुरवठा रात्री शक्य होत नाही. अशावेळी महावितरणची वीज या फिडरवरील ग्राहकांना पुरवली जाते. वीजेच्या दाबात चढउतार आला तरी अत्याधुनिक नियंत्रण प्रणालीने हा दाब समान ठेवला जातो. शेतीपंपांना दिवसा दोन्ही ठिकाणची वीज एकत्र करून थ्रीजीफेज पुरवली जाते तर रात्रीच्या वेळी सिंगल फेज प्रणालीद्वारे वीजपुरवठा सुरु असतो.

कृषी ग्राहकांना सौर कृषिवाहिनीतून होणारा वीजपुरवठा महावितरणकडून केला जातो. या वाहिनीची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनी करते.

वीज वापरापोटी शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली महावितरण मार्फत करून महानिर्मितीकडे जमा करण्यात होते. या वसुलीच्या रकमेतील निश्चित रक्कम महानिर्मितीकडून महावितरणला देण्यात येते. याशिवाय सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या कंपन्यांना देखील प्रति युनिट वीज खरेदी दर ठरवून देण्यात आला आहे.

या प्रकल्पाची देखभाल महावितरणची यंत्रणा करत असून दुरुस्तीचे काम संबंधित कंपन्यांमार्फत होणार आहे यासाठी २० वर्षांचा करार महावितरण आणि ईईएसएल आणि सीईएल या कंपन्यांमध्ये झाला आहे. सौर कृषी फीडर योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी राज्याचे प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यात महावितरण, महाऊर्जा व महानिर्मितीमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील 11 के.व्ही. ते 132 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या 5 ते 10 कि.मी परिसरामध्ये शासकीय जमिनीची उपलब्धतेचा शोध तेथे असे प्रकल्प राबवण्याचे शासनाचे नियोजनं आहे. वावी उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात मिठसागरे आणि मर्हल येथे जागेची उपलब्धी झाली असून तेथे देखील अशाच प्रकारचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती महावितरणचे उप अभियंता अजय सावळे यांनी दिली. .

- Advertisment -

ताज्या बातम्या