सिन्नर-शिर्डी मार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात २५ जखमी

पांगरी | वार्ताहर

सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी जवळ मिरगाव फाट्यावर लक्झरी बस, हायवा डंपर व हुंडाई क्रेटा यांच्या तिहेरी अपघातात 25 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने सिन्नर शिर्डी महामार्ग एक तास बंद असल्याचे मोठी वाहतूक कोंडी परिसरात झाली होती.

अधिक माहिती अशी की, अन्सारी कंपनीचे ट्रॅव्हल क्रमांक एम एच 04 जे यु 21 77 ही ट्रॅव्हल भरधाव वेगाने शिर्डीकडे जात असताना मिरगाव फाट्यावर समृद्धीच्या कामासाठी मुरूम वाहण्याकरिता खाजगी मालकाचा हायवा क्रमांक एमएच 17 बीवाय 1172 अचानक मध्ये आला.

यामध्ये  ट्रॅव्हल्सला डंपरने जोरदार धडक दिली यानंतर ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने ही ट्रॅव्हल समोरून शिर्डीकडून येणाऱ्या क्रेटा क्रमांक एमएच 17 बी व्ही 45 95 वर जाऊन आदळली. या घटनेत क्रेटा गाडीचा चक्काचूर झाला व ट्रॅव्हल रस्त्यावरच आडवी झाल्यानं तब्बल एक तास महामार्ग बंद होता.

यावेळी वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू झाले व तब्बल एक तासानंतर महामार्ग सुरळीत झाला याबाबत अधिक माहिती घेता पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गवळी नितीन जगताप पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवाड पोलीस हवालदार उगले तपास करीत आहेत.

या अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत. जखमींना उपचारासाठी सिन्नर येथील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही रुग्णांना शिर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

क्रेटाच्या वेळीच एअर बॅग उघडल्याने चालक बचावला

ट्रॅव्हल्स गाडीला डंपरने जोरदार धडक दिल्याने ती क्रेटा गाडीवर पलटी झाली. परंतू वेळीच एअर बॅग उघडल्याने चालक रविंद्र गोंदकर हे थोडक्यात बचावले. ते एकटेच प्रवास करत होते.