नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर चार ठिकाणी शिवभोजन थाळी होणार सुरु

jalgaon-digital
3 Min Read

प्रायोगिक तत्त्वावर योजना; 26 जानेवारीला शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी

शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह तीन ठिकाणी 26 जानेवारीपासून दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मालेगाव शहरात एका ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल. प्रत्येक केंद्रात दिवसाला दीडशे थाळी मर्यादा आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्वसामान्यांना थाळीचा लाभ घेता येईल. हा प्रयोग पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर आहे. तो यशस्वी झाल्यास शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार केला जाणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्तेत आल्यास गोरगरिबांसाठी दहा रुपयात जेवण थाळी उपलब्ध करून देऊ, असे जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. राज्यात शिवसेना व दोन्ही काँग्रेसची सत्ता आल्यावर कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये शिवभोजन थाळी योजनेचा समावेश केला होता.

त्यानुसार 26 जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिवभोजन थाळी योजना अंमलात आणली जात आहे. नाशिक जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे कँटिन, पंचवटीतील बाजार समितीतील बळीराजा रेस्टॉरंट व नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेरील दीपक रेस्टॉरंट या तीन ठिकाणांची शिवभोजन थाळीसाठी निवड करण्यात आली आहे.

तर मालेगावला बाजार समितीत ही थाळी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक केंद्राला दिवसाला दीडशे थाळींची मर्यादा देण्यात आली आहे. ही थाळी चाळीस रुपयाला असून सर्वसामान्यांना दहा रुपयात उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक थाळीमागे 30 रुपयाचे अनुदान राज्य शासन देईल.

थाळीत पोळी, भाजी, वरण, भात आदींचा समावेश असेल. दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्वसामान्यांना शिवथाळीचा लाभ घेता येईल. येत्या प्रजासत्ताकदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

जिल्हाधिकारी करणार मॉनिटरींग

शिवभोजन थाळी केंद्रांची निवड करताना शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणाला प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेची मॉनिटरींग जिल्हाधिकारी करणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी थाळीत दिल्या जाणार्‍या अन्नपदार्थांची गुणवत्ता रोज तपासतील. तहसीलदार आठवड्यातून, जिल्हा पुरवठा अधिकारी पंधरवड्यातून व जिल्हाधिकारी महिन्यातून एकदा शिवथाळीचे मॉनिटरींग करतील.

शिवभोजन थाळी योजनेचे स्वरूप अन्नछत्रासारखे नाही. सर्वसामान्यांना माफक दरात जेवण मिळावे हा योजनेचा प्रमुख हेतू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 750 थाळींचा कोटा आहे. शहरात तीन व मालेगावला एका ठिकाणी ही योजना पहिल्या टप्प्यात राबवण्यात येत आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे या योजनेवर वॉच ठेवला जाईल.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *