वडाळानाका, ठक्कर बस स्थानकावर ‘शिवभोजन’ थाळी मिळणार
स्थानिक बातम्या

वडाळानाका, ठक्कर बस स्थानकावर ‘शिवभोजन’ थाळी मिळणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील तिन्ही केंद्रावरील शिवभोजन थाळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून वाढती गर्दी लक्षात घेता येत्या काळात शहरात आणखी दोन ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू केले जाणार आहे. वडाळानाका व ठक्कर्स बसस्थानक या ठिकाणी हे केंद्र सुरू केले जाणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारची शिवभोजन थाळी ही महत्त्वाची योजना आहे. गरिबांना माफक दरात पोटभर जेवण मिळावे हा त्याचा हेतू आहे. मागील 26 जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

राज्यभर शिवभोजनाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शहरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटनेचे कँटिन, नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर आणि पंचवटीतील बाजार समिती आवारात तीन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आली आहे.

तेथे नागरिकांचा वाढता प्रतिसाद आहे. शहरात सुरू असलेल्या तीन शिवथाळी केंद्रांवर प्रत्येकी 150 याप्रमाणे 450 थाळ्यांचे वाटप सध्या सुरू आहे.

आणखी 250 थाळींचे वाटप करणे शक्य असल्याने त्र्यंबकनाका येथील ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात सिद्धेश्वर स्वयंंसेवी संस्थेला तर वडाळा नाका परिसरात द्वारका महिला बचत गटाला शिवथाळी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी 125 याप्रमाणे 250 थाळ्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे.

पहिले तीन महिने राज्यभर ही योजना प्रायोगिक तत्त्वावर अंमलात आणली जात आहे. या कालावधीत जेवणाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया व मते, जेवणाचा दर्जातील सातत्य, लोकांची पसंंती याबाबत अहवाल तयार केला जाईल.

Deshdoot
www.deshdoot.com