निवारा शेडमधील मुस्लिम बांधवांची सहेरी, इफ्तारची सोय

निवारा शेडमधील मुस्लिम बांधवांची सहेरी, इफ्तारची सोय

नाशिक । प्रतिनिधी

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला सुरुवात झाली असून निवारा शेडमधील मुस्लिम बांधव देखील रोजे धरत आहे. न्यू उम्मीद संस्था या बांधवांना सहेरीसाठी जेवण व इफ़्तारसाठी फ्रुट देऊन माणुसकीच्या धर्म निभावत एक प्रकारे अल्लाची इबादत करत आहे.

लाॅकडाऊनमुळे परप्रांतिय मजूर, नागरीक हे जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या निवारा शेडमध्ये आश्रयित आहे. समाजकल्याण विभागाच्या जवळ निवारा शेड उभारण्यात आला आहे. या ठिकाणी मुंबई, ठाणे येथून पायी आलेले बिहार, उत्तर प्रदेशचे मजूरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामध्ये २०० ते २५० मुस्लिम बांधव आहेत. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून स्वयंसेवी संस्थांद्वारे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वाला सुरुवात झाली असून निवारा शेडमधील बांधवांसमोर रोजे धरायचे कसे हा प्रश्न होता.

जिल्हा प्रशासनाने त्यावर मार्ग काढत न्यू उम्मीद संस्थेंच्या मदत घेतली. या संस्थेकडून निवारा शेडमधील मुस्लिम बांधवाना रोजे धरता यावे यासाठी सहेरीसाठि जेवण व इफ्तारच्यावेळी फ्रुट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात पहाटे सहेरीसाठी व्हेज पुलाव, रोट व दूध पुरवले जाते. सकाळी धरलेला रोजा सायंकाळी खजूर व फळांवर सोडला जातो. इफ़्तारच्या वेळी टरबूज, चिकू, पपई, केळी, आंबे, खजूर उपलब्ध करुन दिले जात आहे.

न्यू उम्मीद संस्थेने मदतीचा हात दिल्याने निवारा शेडमधील मुस्लिम बांधवाना रोजे धरणे शक्य झाले आहे. पुढील काळात लाॅकडाऊनमध्ये वाढ झाली तरी निवारा शेडमधील मुस्लिम बांधवाना रोजे धरता यावे, असे नियोजन संस्थेने केले आहे.

एवढेच नव्हे तर इतर गोरगरिबांना किराणा व जीवनावश्यक वस्तुंचे ते वाटप करत आहे. ‘ मजहब नही सिकाता आपस मै बेर रखना’ हा संदेश ते त्यांच्या मदत कार्यातून देत आहे.

जिल्हा प्रशासनाने संपर्क साधल्यावर निवारा शेडमधील मुस्लिम बांधवाना रोजे धरता यावे यासाठी दूध, रोट व फळे पुरवत आहोत. तसेच शंभरहून अधिक आदिवासी बांधवाना किराणा वस्तुचे वाटप केले. नानावली, कथडा, वडाळागाव येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. आम्ही भारतीय आहोत हा एकमेव आमचा धर्म आहे.

– अजमल मुज्मिल खान, न्यू उम्मिद संस्था

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com