Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून बंदीवानांना सोडण्यास सुरुवात

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून बंदीवानांना सोडण्यास सुरुवात

नाशिकरोड । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातील एकूण 17 हजार कैद्यांची पॅरोल व जामीनावर सुटका होणार आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातूनही सुमारे सातशे कैदी पॅरोल व जामीनावर सोडले जाणार असून आतापर्यंत साडेतीनशे कैदी सोडण्यात आल्याची माहिती कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे करोनाचा प्रसार वेगाने होण्याची भिती आहे. काही कैदी व कर्मचार्‍यांना करोना झाला आहे. याची दखल घेत सरकारने उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली.

समितीने निर्णय दिल्यानंतर कैदी मुक्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, देशद्रोह, एमपीडीआयडी, शासकीय मालमत्तचे नुकसान, भ्रष्टाचार, दरोडा बलात्कार, पोस्को, टाडा,मोक्का, अशा कैद्यांना सोडले जाणार नाही. देशभरातील करोनाचा संसर्ग वाढतच आहे. मुंबईच्या आर्थररोड कारागृहात सुमारे दोनशे कैदी व कर्मचार्‍यांना करोना झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे नाशिकरोड कारागृहात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एकालाही लागण झालेली नाही.

नाशिकरोड कारागृहातून कैदी सोडण्यास काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. ज्या कैद्यांना कोर्टाने सात वर्षापर्यंत शिक्षा ठोठावली आहे अशा पक्क्या चारशे कैद्यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्यात येणार असून तीनशे जणांना सोडण्यात आले आहे. ज्या कैद्यांची कोर्टात सुनावणी सुरु आहे अशा तीनशे कच्च्या कैद्यांना कोर्टाच्या आदेशानुसार जामीनवर सोडण्यात येणार आहे. एकूण सुमारे सातशे कच्चे कैदी सोडले जाणार आहेत.

एसटी बस, खासगी गाडीतून हे कैदी घरी रवाना होत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातील हे कैदी आहेत. जाताना त्यांना जेवण करुन, आरोग्य तपासणी करुन सोडले जात आहे. डॉ. सचिन कुमावत आत आणि बाहेर डॉ. ससाणे कैदी व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करत आहेत.

नाशिकरोड कारागृहात एकूण तीन हजार कैदी आहेत. करोना टाळण्यासाठी नाशिकरोड कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन झाले असून कारागृह अधिक्षकांसह महत्वाचे 91 अधिकारी, कर्मचारी महिनाभरापासून कारागृहातच आहे. नवीन येणार्‍या कैद्यांना शेजारील के. एन. केला शाळेत ठेवले जात आहेत. कैदी व कर्मचारी यांची कारागृहात पहिल्या दिवसापासून काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या तापाच्या नोंदी घेण्यात येत आहेत. आतामध्ये सर्वांना मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग, सक्तीचे केले आहे. कैद्यांना नातेवाईकांशी मुलाखती बंद करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या