धक्कादायक : गृहकर्जाची वसुली करण्यासाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला डांबले
स्थानिक बातम्या

धक्कादायक : गृहकर्जाची वसुली करण्यासाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला डांबले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | वार्ताहर

खाजगी फायनान्स कंपनी कडून घेतलेले गृहकर्जाचे हप्ते न भरल्याने वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला घरात डांबून ठेवण्याचा प्रकार तालुक्यातील कारवाडी येथे घडला.

राहुल मधुकर बोडके रा. नायगाव हे महिंद्रा फायनान्स कंपनीत वसुली व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. कारवाडी येथील सुजित अजित फटांगरे यांनी घेतलेल्या गृहकर्जाचे हप्ते थकल्याने बोडके हे सहकाऱ्यासमवेत वसुलीसाठी आले होते.

फटांगरे यांच्या घरी जाऊन त्यांनी गृहकर्जाच्या हप्ते थकल्याबद्दल विचारणा केली.  मात्र, याचा राग आल्याने सुजित फटांगरे, अजित वाल्मिक जाधव यांनी त्यांना कर्जाच्या रकमेवरून शिवीगाळ करून दमदाटी करत  दोघांनाही जाधव यांच्या घरात दोन तास डांबून ठेवले.

यावेळी दगेश पोपटराव बहिरट यांनी बोडके यांना फोनवरून तुम्हाला जंगलात घेऊन जाऊन मारहाण करण्याची व तुमचे वरिष्ठ येईपर्यंत घरातच डांबून ठेवण्याची  धमकी दिली.

अखेर दोन तासांनी वरिष्ठ आल्यानंतर बोडके यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर वरील तिघांविरोधात बोडके यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ देसाई तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com