पोस्ट बँकेची ‘आधार एटीएम’ सेवा; कोणत्याही बँकेच्या खात्यातील पैसे काढण्याची पोस्ट कार्यालयात सुविधा
स्थानिक बातम्या

पोस्ट बँकेची ‘आधार एटीएम’ सेवा; कोणत्याही बँकेच्या खात्यातील पैसे काढण्याची पोस्ट कार्यालयात सुविधा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । अजित देसाई

इंडिया पोस्ट या देशातील सर्वात मोठ्या पेमेंट्स बँकेने ‘आधार एटीएम’ ही नवी संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी आधार संलग्न बँक खात्यावरून कोणत्याही पोस्ट बँकेच्या शाखेतून पैसे काढणे शक्य होणार आहे.

एईपीएस या नावाने ही सेवा देशातील जवळपास सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम आधार पडताळणी करून काढता येणे शक्य होणार असल्याने ज्या भागात बँकेची शाखा नाही त्या बँकेच्या खातेदारांना आपत्कालीन परिस्थितीत मोठा आधार मिळणार आहे.

आपला आधार क्रमांक हाच आता आपले एटीएम कार्ड असणार आहे. तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी पोस्ट बँकेत जाऊन तुमच्या खात्यावर असणाऱ्या शिल्लक रकमेतून दहा हजारापर्यंतची रक्कम आता सहजपणे काढता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी तुम्हाला एटीएम जवळ बाळगण्याची देखील गरज भासणार नाही.

पोस्ट बँकेच्या या सेवेचा लाभ दुर्गम भागात देखील मिळणार असून जवळपास पैसे काढण्याची सोय नसल्यास तुमच्यासाठी ‘आधार एटीएम’ हाच खऱ्या अर्थाने आधार ठरणार आहे.

त्यामुळे आता पगार झालाय पण एटीएम दूर आहे, जवळ पैसे काढायची सोय नाही, एटीएम मशीनमध्ये पैसे संपलेत, एटीएम कार्ड जवळ नाही या अडचणी तुम्हाला नक्कीच येणार नाहीत. कोणत्याही भागात असलात तरी जवळचे पैसे संपल्यावर काळजी न करता केवळ जवळच्या पोस्टात जायचे आणि आधार व्हेरिफिकेशन करून तुमच्या बँकेच्या खात्यावरील रक्कम काढण्याचा पर्याय आता पोस्ट बँकेने उपलब्ध करून दिला आहे.

या सेवेबद्दल नाशिकचा विचार करायचा झाल्यास डाक विभागातील 293 ठिकाणी हि सुविधा उपलब्ध असून पोस्ट मास्तर आणि पोस्टमन यांच्या मदतीने या सेवेचा लाभ घेता येणार आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवणसारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम असणाऱ्या भागात या सेवेचा उद्देश यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

विभागाचे प्रवर डाक अधिक्षक आर.डी. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेच्या नाशिक शाखेचे वरिष्ठ प्रबंधक राजेंद्र आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागात आधार संलग्न भुगतान ( एईपीएस) सेवा प्राधान्याने राबवण्यात येत असून आता सर्वच भागात या सेवेचा विस्तार करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com