गंगापूर राेडवरील ५१ लाखांच्या घरफाेडीची उकल; माेलकरणीनेच रचला डाव, पाच अटकेत

गंगापूर राेडवरील ५१ लाखांच्या घरफाेडीची उकल; माेलकरणीनेच रचला डाव, पाच अटकेत

नाशिक । प्रतिनिधी

सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गंगापूररोड परिसरात असलेल्या एका बंगल्यात चोरट्यांनी हात साफ करत 51 लाखांचे दागिने व रोकड असलेली तिजोरी घेऊन पोबारा केल्याची घटना सोमवारी (दि.28) रात्री घडली होती.

नाशिक शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयाची सुई मोलकरणीकडे येत असल्याने चौकशी केली. विश्वासात घेतल्यानंतर मोलकरणीनेच हा चोरीचा डाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक  करण्यात आली असून 51 लाखांपैकी 25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रोमेश विजय लुथरा (36) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी आनंदव्हिला नावाचा बंगला आहे.

या बंगल्यात सोमवारी रात्री 8 ते 10 वाजेच्या सुमारास ही चोरी झाली.त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला घेऊन कॉलेजरोड येथील रुग्णालयात गेले होते.

पावणेदहा वाजेच्या सुमारास लुथरा हे आपल्या आई, पत्नीसह घरी परतले असता ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आईने जेव्हा आपल्या बेडरूममधील कपाट उघडले तेव्हा, कपाटात ठेवलेले लॉकर गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब रोमेश यांना सांगितली.

रोमेश यांनी बेडरूममध्ये जाऊन खात्री केली असता तिजोरीच चोरांनी उचलून नेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोमेश यांनी त्वरित घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना दिली.

वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने गांभीर्यपूर्वक तपासाची चक्रे फिरवली. घरात कोण काम करते, कोण केव्हा येते याबाबत माहिती घेतली. त्यानंतर मोलकरणीवर संशय बळावल्याने विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मोलकरणीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com