Photo Gallery : असंख्य दिव्यांनी उजळले नाशिक; फटाके वाजवल्याने शांतता भंग

Photo Gallery : असंख्य दिव्यांनी उजळले नाशिक; फटाके वाजवल्याने शांतता भंग

नाशिक | प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील लाईट्स बंद करून घराच्या गॅलरीमध्ये, अंगणात दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनास देशभरातून प्रतिसाद मिळाला. नाशिक शहर असंख्य दिव्यांनी उजळले होते. ‘गो कोरोना गो’ च्या घोषणा अनेकांनी दिल्या.

दुसरीकडे मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून शहरात असलेल्या स्मशानशांततेला नाशिककरांनी बाधा पोहोचविल्याचे दिसून आले. अनेकांनी घराच्या, सोसायटीच्या गच्चीवर अंधारात जीव धोक्यात घालून नाशिकमधील दीपोत्सव अनुभवण्यासाठी गर्दी केली.

काही अतिउत्साही मंडळीने फटाकेदेखील वाजवले. शिट्ट्या, आरोळ्या ऐकू आल्याने कुठेतरी शांतता भंग झाल्याचे दिसून येत होते. अनेकांनी शंख फुंकून या दीपोत्सवाचे मनोभावे स्वागत करत पंतप्रधान मोदींच्या आवाहनास प्रतिसाद दिला. अंधारात दिव्याच्या प्रकाशात अनेकांनी फोटोसेशनदेखील केले.

एकून दहा ते पंधरा मिनिटे चाललेला हा कार्यक्रम सव्वानऊ वाजेच्या सुमारास संपला. काही क्षणातच अनेकांनी घराकडे कूच केलेली दिसून आली. मोदींनी आपापल्या घरात राहून दिवे लावण्याचे आवाहन केलेले असताना अनेकांनी घराबाहेर पडून हा आनंद घेतल्यामुळे कुठेतरी या गोष्टीचा अतिरेक झालेला बघायला मिळत होता.

कोरोना विरोधात आमच्या सोसायटीत अंधार करून सर्व मंडळी छोटा दिवा घेऊन बाल्कानीत आली. माझा नातू वरदही त्याच्या घरी इंदिरा नगर ला सहभागी झाला होता. यामधून अख्खा देश एकवटला कोरोना विरोधात. यामधून सर्व जगाला भारतातील ऐक्य दिसले. भारत माता की जय म्हणत नाशिकमधील वकील असलेल्या मिलिंद चिंधडे यांनी देशदूतकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील आणि बागलाण तालुक्यातील अंबासन या गावात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. गावात प्रत्येकाच्या दारा समोर दिवे लागलेले दिसले. संपूर्ण नऊ मिनिटे ग्रामपंचायतीच्या भोग्यावर शुभम करोती  कल्याणंम आरोग्यंम धनसंपदा! असा मंत्र जपला जात होता.

नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनास न भूतो न भविष्यती असा भारतीय जनतेचा प्रतिसाद ! जात- पंथ-धर्म यांच्या भिंती ओलांडून आम्ही भारतीय म्हणून सर्व एक आहोत !  तमाम भारतीय जनतेला त्रिवार अभिवादन !जय हिंद!  अशी प्रतिक्रिया दिंडोरीच्या भाजप खासदार खा. डॉ. भारती प्रवीण पवार देशदूतकडे व्यक्त केली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com