Photo Gallery : मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव; स्हेनसंमेलनात सकारात्मक विचारांचा जागर
स्थानिक बातम्या

Photo Gallery : मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव; स्हेनसंमेलनात सकारात्मक विचारांचा जागर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इस्पॅलियर हेरिटेज स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात 

नाशिक | प्रतिनिधी 

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्व बिंबवणारे, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगत स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मनीं नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे..या अभंगासह छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करत विद्यार्थ्यांनी कलाकृतींच्या माध्यमातून प्रबोधनाचा वसाच जणू पुढे चालवला. निमित्त होते, इस्पॅलियर हेरिटेज स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.

ग्रेट पीपल, ग्रेट थॉट या संकल्पनेवर यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भुजबळ नॉलेज सिटीच्या विश्वस्त शेफाली भुजबळ उपस्थित होत्या.

याप्रसंगी शाळेचे प्रमुख सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापिका सबा खान यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगल्या विचारांचे अधिष्ठान महत्वाचे असते. व्यक्तीला संपवणे सहज शक्य असते, परंतु, त्याच्या विचारांना संपवणे शक्य नसते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महान व्यक्तींचे विचारच समाजाची बलस्थाने आहेत.

नव्या पिढीतील मुलांना या थोर व्यक्तींच्या जीवनकार्याविषयी माहिती व्हावी, त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने या स्नेहसंमेलनात नाटक, नृत्य, अभंग, भावगीते, देशभक्तीपर गीते सादर करत विद्यार्थ्यांना उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्लॅस्टिकचा वापर करून तयार केलेल्या बॅण्डचे सादरीकरणाने उपस्थितांकडून दाद मिळवली.


अनोख्या संगीताने वेधले लक्ष

कोणतेही वाद्य न वाजवता विद्यार्थ्यांनी टाळ्या व पायांच्या चालण्यातून निर्माण झालेल्या आवाजातून एक वेगळी संगीत कलाकृती सादर केली. सूर, ताल आणि लय यांचा सुरेख मिलाफ असलेली या कलाकृतीने विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेचे दर्शन घडविले. त्याला सर्वांनीच वन्स मोअरची दाद दिली.


स्वामी समर्थ केंद्राचे मोरे यांना यंदाचा बी द चेंज अवॉर्ड

स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून मुलांवर बालसंस्कार करणारे नितीन मोरे यांना इस्पॅलियर हेरिटेज स्कूलतर्फे यंदाचा बी द चेंज हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. वेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पालकांना हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com