Photo Gallery : तळीरामांचा मोर्चा वाईन शॉपकडे; वाहतुक कोंडीत भर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Photo Gallery : तळीरामांचा मोर्चा वाईन शॉपकडे; वाहतुक कोंडीत भर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नाशिक । प्रतिनिधी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केंद्र सरकारने लागु केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यत वाढविला असला तरी केंद्राच्या आदेशानंतर आजपासुन राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. यात सोशल डिस्टन्सिंगच्या अटीवर दारुची दुकाने सुरू होऊन शहरात विविध भागात आज सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी तळीरामाच्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी वाहतुकी कोंडी झाल्याने करोनाचा प्रादुर्भावाची शक्यता अधिक वाढली आहे.

राज्य शासनाने दि. 3 मे रोजी राज्यातील अत्यावश्यक सेवेसह इतर अनावश्यक दुकाने व आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याकरिता सोशल डिस्टन्सिंगचे व दुकानात एका वेळेस पाच ग्राहक असावेत, असे नियम पाळण्याच्या अटीवर आता दुकानदारांना दुकाने खोलता येणार आहे. या सवलतीचा पहिला फायदा शहरातील दारु दुकानांना मिळाल्याचे दिसुन आले.

शहरात असलेले देशी – विदेशी व बियरची दुकाने सुरू होण्यापुर्वीच शहरात तळीरामांनी दुकानासमोर रांगा लावल्याचे दिसुन आल्याने पोलीसांनी यासंदर्भात दुकान संचालकांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी या रांगाबद्दल आम्हाला मािंहती नसल्याचे सांगितले.

दुपारी जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर दारुच्या दुकानांना परवानगी देण्यात आल्यानंतर दुकान संचालकांनी खाजगी सुरक्षा रक्षकांसह दुकाने सुरू केली. यावेळी दुकानासमोर लागलेल्या रांगा या थेट रस्त्याच्या कडेला आल्याचे दिसुन आले. याठिकाणी दुकानासमोर केवळ पाच ग्राहकाची अट असतांना आणि रांगेत उभे असलेल्यांंनी दोघात 1 मीटरचे अंतर पाळण्याचे भान ठेवले नाही. शहरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याचे दिसुन आले.

शहरातील गंगापुर रोड भागात रस्त्यांच्या लगत असलेल्या दारुच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने यामुळे रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनांची कोंडी झाली. यासंदर्भात काही जागृत नागरिकांनी याकडे पोलीसांचे लक्ष वेधण्याचे काम केले. परिणामी गंगापूररोड भागातील वाहतुक काहीवेळ विस्कळीत झाली होती. एकुणच दारु दुकाने तब्बल दीड महिन्यानंतर सुरू झाल्याने तळीरामांनी भर उन्हात रांगा लावल्या. याचा नागरिक व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

टप्प्या टप्प्याने दुकाने उघडता आली असती…

राज्य शासनाने ज्या काही सवलती विनाअत्यावश्यक सेवा – दुकानांसाठी दिल्या आहे. त्यात एका लाईन मधील पाच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच प्रमाणे जिल्हा प्रशासनाला दारुच्या दुकाने देखील टप्प्या टप्प्याने सुरु करता आली असती. तसेच मोठे रस्त्यालगत असलेल्या दुकानांना कठोर नियम लावता आले असते. असे न केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

मागील 14 एप्रिल रोजी शहरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने जिल्हा प्रशासनाकडुन त्याच दिवशी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा दुकानाच्या वेळेत दिलेली शिथिलता रद्द करण्यात आली होती. आताही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्यास ही दुकाने बंद करण्याचे अधिकार असल्याचे याचा वापर व्हावा, अन्यता करोनाचा प्रादुर्भाव वाढुन याचे उलटे परिणाम शहराला भोगावे लागतील अशा संतप्त प्रतिक्रीया ऐकायला मिळत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com