Friday, April 26, 2024
Homeनाशिकअरेरे! मालेगावी करोना योद्ध्यांनीच काढली रस्त्यावर रात्र

अरेरे! मालेगावी करोना योद्ध्यांनीच काढली रस्त्यावर रात्र

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव हा करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. जिल्हाभरातून या ठिकाणी आरोग्य विभागातील डॉक्टर तसेच कर्मचार्‍यांना मालेगाव येथे पाठवण्यात येत आहे.  नाशिकवरून शनिवारी रात्री मालेगावला पोहोचलेल्या परिचारीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याने त्यांनी रस्त्यावरच रात्र जागून काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

- Advertisement -

यामुळे नर्सेस असोसिएशनसह सर्वच आरोग्य संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलनाचा इशारा दिल्याचे नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पुजा पवार यांनी सांगितले.

मालेगाव येथील करोना रुग्णांचा वाढता ताण पाहता नाशिकहून जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या काही परिचरिकांना मालेगाव येथे जाण्याचे आदेश देण्यात आले.

२० डॉक्टर, २४ परिचारिका आणि परिचर अशा ४४ जणांचा सामावेश होता. मात्र, या परिचरिकांची राहण्याची कोणतीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नसल्याचे समोर आले आहे.

शनिवारी दुपारनंतर त्यांना वाहन उपलब्ध करण्यात आले. यामुळे मालेगाव इथं रुजू होण्यास रात्र झाली. मालेगावमध्ये त्या सर्वांची ज्या ठिकाणी निवासव्यवस्था करण्यात आली होती ते आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची अवस्था अतियश दयनिय होती.

संपुर्ण वसतीगृहासह त्यातील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे. जवळपास सर्वच स्वच्छता गृहाचे दरवाजे आणि खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.

कित्येक दिवसांपासून हे आदिवासी मुलांचे वसतिगृह धूळखात पडून असल्याचे फोटो तेथे गेलेल्या कर्मचार्‍यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना पाठवले.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. विशेष म्हणजे या 30 महिलांना आणि 10 पुरुषांना एकत्र याच वसतिगृहात राहण्याचा सल्ला देण्यात आला.

अशा गैरसोय असलेल्या ठिकाणी राहण्यास परिचारीकांनी नकार दिला. तर रात्री दोन वाजेपर्यंत या सर्व परिचारीका व कर्मचारी त्यांची वैयक्तीक पातळीवर राहण्यासाठी इतरत्र जागेचा शोध घेत होत्या. परंतु दुसरीकडे कोठेही त्यांची व्यवस्था नसल्याने त्यांनी आहे त्या परिस्थितीत एकत्र रस्त्यावर रात्र काढली.

मालेगाव येथे दाखल झालेल्या परीचरिकांनी घटनास्थळी असलेल्या वस्तुस्थितीचे कथन केल्यानंतर नाशिक जिल्हा परिचारिका असोसिएशनच्या वतीने या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवला असून काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे झाल्यास नाशिक आणि मालेगाव मधील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

परिचारिका संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

मालेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिचारीकांचे पथक पाठवले परंतु प्रशासननाचे ढिसाळ नियोजनामुळे परिचरिकांचे रात्रभर हाल झाले. करोना रूग्णांची आम्ही थेट संपर्कात राहून जीवावर उदार होऊन सेवा करतो. आमच्या परिचारीका करोनाला अजिबात भित नाहीत. परंतु त्यांना किमान सुविधा तरी मिळाव्यात. असे न झाल्यास त्यांची मानसिकता रुग्णालयात काम करण्यासाठी तयार होईल का? असा प्रश्न  आहे. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था न झाल्यास कामबंद आंदोलनाच्या भूमिकेत आम्ही आहोत.

पुजा पवार, अध्यक्ष, जिल्हा परिचारिका असोसिएशन

मालेगाव उपायुक्तांकडून व्यवस्था

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने आम्ही येयील पथक पाठवले होते. परंतु मालेगाव येथे राहण्याची व त्यांच्या इतर चांगल्या सुविधा महापालिकेने करणे आवश्यक होते. याबाबत रात्री तक्रारी येताच नोडल अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले येथील डॉ. निखिल सैंदाने यांच्याशी चर्चा करून त्यांनी मालेगावचे उपायुक्तांकडे पाठपुरावा करून मालेगाव कॅम्प येथे चांगल्या वसतीगृहात या पथकाची व्यवस्था केली आहे.

– डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -

ताज्या बातम्या