वा रे पठ्ठ्यांनो! निमगाव सिन्नरचे अकरा तरूण एकाच वेळी सैन्यदलात भरती; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

वा रे पठ्ठ्यांनो! निमगाव सिन्नरचे अकरा तरूण एकाच वेळी सैन्यदलात भरती; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

वडांगळी | वार्ताहर 

निमगाव सिन्नर येथील एकाच वेळी अकरा तरुणांची सैन्यदलात एकाच वेळी भरती झाली आहे. गावाच्या इतिहासात प्रथमच ११ तरुण देशसेवा करणार असल्यामुळे ग्रामस्थांनी डीजे च्या तालावर या तरुणांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे, एकट्या निमगाव सिन्नर गावातील जवळपास दीडशे तरुण देशातील विविध भागात देशसेवा करत आहेत.

निमगाव सिन्नर दुष्काळी टापूतील शेतीप्रधान गाव आहे. शेतीला बारामाही पाणी नसल्याने फक्त पावसाच्या पाण्यावर शेतीचा खरीप हंगाम होतो. येथील जनतेने वर्षानुवर्षे दुष्काळ सहन केला आहे. आजही यात काही बदल झालेला नाही. मात्र, येथील तरुणांनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे ठरवत आज दीडशेहून अधिक तरुण सैन्यात दाखल झालेले आहेत. यामुळे या गावाला सैनिकांचे गाव असेही म्हटले जाते.

नुकत्याच एका भारतातील सैन्यात भरती झालेल्या अकरा तरूणापैकी दोन जण एकाच कुटूंबातील सख्ये भाऊ आहेत. या तरूणांनी सैनिक भरतीप्रक्रियेसाठी कोणतेही भरती सराव अँकेडमीत न जाता भरतीप्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे.

सैन्यभरतीसोबतच गावातील अनेक मुलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचीदेखील तयारी करत आहेत. यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा आदर्श घेऊन येथील सिन्नर बारागांव पिंप्री मार्ग निफाड रस्त्यावर दररोज पहाटे व रात्री सुमारे शंभरपेक्षा अधिक तरूण नेहमी सराव करत असतात.

येथील व्ही एन नाईक संस्थेच्या पटांगणात हा सैन्य भरतीचा सराव ही मुलं करत आहेत.निवड झालेले सर्व तरुण सामान्य.शेतकरी कुटुंबातील आहेत. या तरुणामध्ये सायन्स शाखेची मुले सैन्यात देशसेवेसाठी जात आहे.

आपल्या मुलांनी सैन्यात नोकरी मिळविली असल्यामुळे घरच्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी सरपंच सुनिता सांगळे, शिवाजी शेळके, दत्तात्रय सानप, जनार्दन सानप, चांगदेव सानप, नारायण सांगळे, अमूता सांगळे यांनी अभिनंदन केले आहे.

अशी आहेत तरुणांची नावे

ऋषिकेश शिवाजी शेळके, शिवम मंगेश सानप, मयूर श्रीहरी सानप, विशाल उत्तम सानप, विक्रम उत्तम सानप, अनिल दत्तू सानप, अंकुश विलास सानप, श्याम बाळू पानसरे, आदित्य नवनाथ सानप, रवींद्र वालीबा सानप, नितीन सोमनाथ सानप

शेतमजूरांची दोन मुले सैन्यात निमगाव सिन्नरच्या अकरा तरूणापैकी निवड झालेल्या मध्ये विशाल व विक्रम सानप हे दोघे तरूण सख्खे भाऊ आहेत. या सानप कुटूंबात त्यांची आई शैला सानप व वडील उत्तम सानप दोघे शेतमजूर आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांची सैन्यात निवड झालेल्या गावात या परिवाराच्या कष्टाला फळ मिळाले आहे. 

आमच्या गावातील जे तरुण सैन्यात दाखल झाले त्यांची प्रेरणा आम्ही घेतली. त्यातून आवड व इच्छा निर्माण झाली. मी सायन्सचा विद्यार्थी आहे.

ऋषीकेश शेळके, निमगाव सिन्नर

दररोज आम्ही ढग्या डोंगराची चढाई करून सराव केला. स्थानिकांच्या मदतीमुळे मैदान व्यायामासाठी मिळाले आहे. माझे वडील चालक व आई शिवणकाम करते. माझी सैन्यात जी डीत निवड झाली आहे

रविंद्र सानप निमगाव सिन्नर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com