Blog : संकल्प असावा परी आळस नसावा!
स्थानिक बातम्या

Blog : संकल्प असावा परी आळस नसावा!

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | माधुरी रोहम

चालता बोलता 2019 हे वर्ष संपले. 2020 चे स्वागत करण्यासाठी प्रत्येकावरच शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रत्येकाची नवीन वर्षाच्या नवीन संकल्पाची तयारीदेखील सुरु झाली.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रत्येकाच्या संकल्पामध्ये वैविध्य बघावयास मिळाले. अनेकांचे संकल्प काळानुसार बदललेलेही बघायला मिळाला.  यात कुणाला जेवण बनविणे शिकायचंय तर कुणाला भारतीय संस्कृतीतील पारंपारिक पदार्थ बनवायचे शिकायचे आहे.

अनेकदा आपण जो संकल्प करतो तो वर्षभरासाठी खरंच असतो का? संकल्प केला जातो पण तो निभावला जातो का? नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे केलेला संकल्पही काळाच्या ओघात केल्या पडद्याआड जातो ते समजतही नाही.

संकल्प जातो तशी त्याची कृतीही त्याच ठिकाणी अंत पावते. यावर्षी आपल्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही. आपल्यातील कमकुवत मुद्दे आपण या वर्षी खूप मेहनतीने बलस्थान कशी ठरतील या दृष्टीने मार्गक्रमण करणार आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच किती छान उत्साहाने आपण एखांदा संकल्प करतो. सुरुवातीचे काही दिवस वगळता नंतर काय त्याचं? का होतं बरं असं? कुठं जाते ती आपल्या मधली जिद्द? ठरवलेली स्वप्न पूर्ण करण्याची ती तळमळ, तो ध्येयवेडा प्रवास का मध्येच हरवतो? का थांबून घेतो आपण मध्येच?

आपला संकल्प हा आपल्या जीवनाचे एक वळण असते. ते वळण आपण निवडलेले असते. आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी केलेली ती एक छोटीशी धडपड असते. जुने सगळेच विसरता येत नाही म्हणून नव्याने काहीतरी करण्याचा तो एक प्रांजळ प्रयत्न असतो.

त्यात भावना असतात, जगण्याची आशा असते. चांगलं असं वागणं असतं, आतून आलेलं जगणं असतं. जास्त काही नाही पण आकाशाला गवसणी घालण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असतो.

आपले स्वप्न, आपले ध्येय. सगळं काही आपलंच असतं आपल्यासाठी. पण मग या सगळ्या आपल्यासाठी का आपण मधूनच धीर सोडतो. नवीन वर्ष नवीन शुभारंभ म्हणून केलेली सुरुवात मध्येच कुठेतरी विसरून जातो.

फक्त नवीन वर्ष लागले आणि काहीतरी ठरवले म्हणजे संकल्प नसतो. तर आनंदाच्या शोधात असताना जीवनातील नकारात्मकता काढून टाकण्याचा तो एक संघर्ष असतो.

या संघर्षातून पुढे जाऊन नवीन तेजदायी जीवन जगायचे असेल तर मनात जिद्द पक्की असली पाहिजे. त्यासाठी जीवाचे रान करायची आपली तयारी असणं गरजेचे आहे.

काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही अशी मनाची खंबीरता हवी. काहीही झाले तरी मी लढणार, पुढे जाणार आणि नक्कीच विजयी होणार आहे…अशी दृढ श्रद्धा, इच्छाशक्ती असली पाहिजे. ही इच्छाशक्ती असली तर या जगात   कुणीही तुमचा संकल्प मोडू शकणार   नाही. अथवा यात बाधा आणण्याचा प्रयत्न करणार नाही.

Deshdoot
www.deshdoot.com