Monday, April 29, 2024
Homeनाशिकदेशातील लॉकडाऊन संविधानानुसारच; यंदाची जयंती घरातूनच साजरी करूया

देशातील लॉकडाऊन संविधानानुसारच; यंदाची जयंती घरातूनच साजरी करूया

कॅप्टन कुणाल गायकवाड याचे आवाहन

नाशिक | आज जगभरात करोणा व्हायरसने थैमान घातले आहे. कोणत्या क्षणी हा आजार कोणाला होईल याची काही शाश्वती नाही, म्हणून तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन कठोर निर्णय घेत आहे. यावर इलाज मात्र अजून सापडत नाही पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी कोरोनाशी दोनहात करताना दिसताय.

येत्या 14 एप्रिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या निमित्त मला वाचनात आलेली गोष्ट आपणा समोर ठेवत आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली. कोरोना विरुद्ध आपण सर्वजण एकजुटीने लढू आणि निश्चितच सफल होऊ.
हे २१ दिवस काही अंशी सत्कारणी लागावे म्हणून एक मुद्दा आपल्यासमोर ठेवू इच्छितो. अर्थातच ज्यांना हे शक्य असेल त्यांनीच यावर विचार करून अंमल करावा.

- Advertisement -

ज्यांना शक्य नसेल अथवा इतर काही प्राधान्यक्रम असतील तर त्यांनी केवळ खाली दिलेला बाबासाहेबांच्या जीवनातील तो प्रसंग वाचावा इतकेच. बाबासाहेबांनी १४ दिवस स्वतःला ऑफिसमध्ये बंद केले होते कशासाठी? १९१९ च्या सनदेतील तरतुदीनुसार १० वर्षांनंतर संविधानिक अधिकारांच्या बाबत सूचना देण्यासाठी सरकार कमिशन नियुक्त करेल असे प्रावधान होते.

त्यानुसार, Indian Statutory Commission म्हणजेच सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. बहिष्कृत वर्गाच्याच नव्हे तर अखिल राष्ट्राच्या रहाटगाड्याचे नियमन संविधानिक दृष्टीने ठरणार होतं. विवक्षित वर्गांच्या संविधानिक प्रश्न, अधिकार, संरक्षक प्रावधान इत्यादी बाबतीत मत मांडायचे होते. साक्ष द्यायची होती. यासाठी जगभरातील संविधानिक व्यवस्थेचा सखोल अभ्यास हवा हे उद्दिष्ट समोर ठेवून बाबासाहेबांनी १४ दिवस बंद खोलीत जगभरातील घटनांच्या दर्जेदार ग्रँथांचा अभ्यास केला. तो प्रसंग खैरमोडे यांनी लिहून ठेवला आहे.

‘आतापर्यंतचा त्यांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास अर्थशास्त्र व कायदा या विषयांचा होता. राजकारणावर त्यांनी काही पुस्तके वाचलेली होती. आता राज्यघटनेचा प्रश्न हिंदी राजकारणात प्रामुख्याने चर्चिला जाणार व त्यावेळी आपण मूग गिळून बसणे म्हणजे नामुष्कीची गोष्ट होय, याची साहेबांना जाणीव होती.

आणि असली लाचारी त्यांच्या स्वभावाला उचलणे शक्य नव्हते. तेव्हा ५ ऑगस्ट १९२८ ला त्यांची प्रांतिक समितीवर निवड जाहीर होताच त्यांनी ६ व ७ तारखेला अनेक मित्रांकडून ४०० रु. उसने गोळा केले व ते ८ तारखेला प्रो. पी. ए. वाडिया यांना बरोबर घेऊन तारापोरवाला बुकसेलर्सकडे राज्यघटनेवरील इंग्रजी ग्रंथ विकत घ्यायला गेले.

तेथे त्यांनी ८५० रु. चे ग्रंथ विकत घेतले. ९ ऑस्ट २८ पासून सकाळी आपल्या ऑफिसच्या खिडक्या बंद दरवाजा बंद करून साहेब या विकत घेतलेल्या १५-२० ग्रंथांच्या अभ्यासाला बसले. काही लोक यायचे व दरवाजा ठोठवायचे. साहेब त्रासिक मुद्रेने त्यांना चालते व्हा म्हणायचे.

पण दुसऱ्या लोकांचे येणे व्हायचेच. मग साहेबांनी मडके बुवा ला सांगितले की, दरवाजाला बाहेरून कुलूप लावा व मला इरकण्याकडून खिडकीतून सकाळी, दुपारी व संध्याकाळी चहा देण्याची व्यवस्था करा. जेवणही खिडकीतूनच दुपारी व रात्री द्या. मडके बुवांनी व्यवस्था केली.

आणखी काही कामाची जरुरी पडली तर मी बाहेर आहेच, मला बोलवा, असे म्हणून मडके बुवा ऑफिसच्या बाहेर बाकावर झोपून राहिले. असा क्रम दोन आठवडे चालला होता. साहेबांनी राज्यघटनेचा आमूलाग्र अभ्यास पुढील काळात केला. पण त्याची सुरुवात अशी झाली होती…”

(संदर्भ– डॉ.भीमराव रामजी आंबेडकर खंड २, चांगदेव भगवान खैरमोडे, पृ.१८७)

बाबासाहेबांच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय महत्वाचा व महाप्रेरणादायी आहे, यावर अधिक ते काय बोलणे ? २१ दिवसांच्या या लॉकडाऊन मूळे आलेल्या परिस्थितीचा उपयोग करून एक तरी विषय वगैरेचा आपण अभ्यास करूयात.

हे सगळ लिहायचे कारण असे की, काही दिवस समाजाचा अतीव कळवला असलेले वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत आहेत. त्यातल्याच एकाने मला विचाराल जयंती साजरी करायची की नाही? मी लागलीच नाही म्हणून सांगितलं. त्यावर ते महाशय भडकले असं कसं नाही म्हणता.

परंतु मित्रहो आज देश ज्या संकटातून जात आहे, त्याचा विचार केला तर फक्त भावनिक होवुन चालणार नाही. आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र येतो हे जरी सत्य असले तरी हा आजार इतका भयंकर आहे की, एकाच वेळी कितीतरी घरांना बरबाद केल्या शिवाय राहणार नाही.  हा व्हायरस कोणाची जात धर्म पाहत नाही. जो याच्या वाटेत येईन त्याला हा गिळून पुढेच जातो आहे.

काही महभाग तुम्हाला भडकवुन देतील… काही होत नाही आपण जयंती साजरी करू… तर त्यांना स्पष्ट सांगा जर समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 दिवस बंद खोलीत राहून अभ्यास करू शकता तर आम्ही सुद्धा येत्या काही दिवस  हे नियम पाळू आणि हे संकट दूर होताच महामानवाला अभिवादन करायला जाऊ.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच देशात लॉकडाऊन केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. ही आहे डॉ. आंबेडकर यांची दिव्य दृष्टी आणि म्हणूनच त्यांनी अशा कठीण प्रसंगातही काय उपाय योजना करता येतील अशी तरतूद करून ठेवली आहे.

मित्रहो आपणास विनंती आहे की यावेळी सर्वानी महामानवाला आपल्या घरातूनच मानवंदना द्यावी. आपआपल्या घरात जयंती साजरी करूया! आणि हा कोरोना देशातुन हद्दपार करू!  १२९ व्या जयंतीनिमित्त हीच आपली मिरवणूक व हेच आपले अभिवादन ठरेल अशी आशा बाळगतो.

नमो बुद्धाय! जय भीम!

- Advertisment -

ताज्या बातम्या