बिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत
स्थानिक बातम्या

बिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवीन नाशिक | वार्ताहर

पाथर्डी पंचक्रोशीत असलेल्या दाढेगाव गावात संध्याकाळी व रात्रीच्या वेळेला बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून मळ्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व दाढेेगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सकाळी मुरली सोनवणे यांच्या मळ्यामध्ये असलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे भयभीत झालेल्या सोनवणे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वनसंरक्षण विभागाला याची माहिती देत पिंजरा बसवण्याची मागणी केली

याआधीही मागील आठवड्यात अनिता भोर संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराजवळ भांडे घासत असताना त्यांना बिबट्या दिसला होता. पाळीव कुत्र्याच्या व भोर यांच्याआवाजाने ग्रामस्थ धाऊन आल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली होती.

या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून केव्हाही अनर्थ घडण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थ व मळ्यातील शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास व पिंजरे उपलब्ध न करून दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अंकुष भोर , मुरली सोनवणे , रोशन गवळी , संदीप भोर ,राजू सोनवणे ,बाळू पालवे , संजय भोर , संतोष भोर, यशवंत पालवे , विशाल भालके, बाळा रोकडेे ग्रामस्थ यांनी दिला आहे.

पाथर्डी पंचक्रोशीत उसाचे मळे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यातच कॅन्टोन्मेंट बोर्डाचा जंगलव्याप्त परिसर येत असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर नेहमीचा चर्चेचा विषय ठरलेला आहे . फॉरेस्ट विभागाकडे पिंजरयांची कमतरता असल्याने वेळोवेळी निवेदने व मागणी करूनही केंद्रे उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे

Deshdoot
www.deshdoot.com