Video : बापरे! नामको रुग्णालयातील बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद
स्थानिक बातम्या

Video : बापरे! नामको रुग्णालयातील बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील पेठरोड वर असलेल्या नामको चॅरीटेबल ट्रस्ट सुपरस्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री बिबट्याचा संचार आढळून आला. रिसेप्शनचा दरवाजा बंद असल्याने काही वेळातच बिबट्याने याठिकाणाहून धूम ठोकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

अधिक माहिती अशी की, पेठ रोडवरील आरटीओ ऑफिसच्या समोर नामको चॅरीटेबल ट्रस्ट सुपरस्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटल आहे. मध्यरात्री मुख्य दरवाजातून बिबट्याने दवाखान्याच्या प्रांगणात प्रवेश केला. यावेळी पहिल्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याने बिबट्याला बघितले. यावेळी हॉस्पिटलचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे बिबट्याला सुदैवाने आत प्रवेश करता आला नाही. कर्मचाऱ्याने आरडाओरड केल्याने काहीसा आवाज याठिकाणी झाला होता. यादरम्यान, बिबट्याने  रुग्णालय परिसरातून धूम ठोकली.

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याठिकाणी तात्काळ दाखल झाले.  सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांनी बिबट्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस मोकळी जागा आहे तिकडेच बिबट्या गेला असावा असा अंदाज बांधला जात आहे.

दुसरीकडे दवाखान्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली असून कुठेही बिबट्या दिसून आलेला नाही. आज सकाळी रुग्णालयाचे नियमित कामकाज सुरु असून रुग्णांनी तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन हॉस्पिटल प्रशासन आणि वनविभागाकडून करण्यात आले आहे.

अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमणार

रुग्णालयाच्या गेटवर २४ तास सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार  येणार आहेत. दवाखाना परिसरात रात्रीच्या वेळी कुठेही लाईटस बंद होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाणार आहेत.रुग्णालय परिसरात तपासणी झाली आहे. कुठेही बिबट्या आढळून आलेला नाही. तरी रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये.

शशिकांत पारख, संचालक, नामको

Deshdoot
www.deshdoot.com