सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कमी करणार परीक्षा कालावधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कमी करणार परीक्षा कालावधी

परीक्षा मंडळाच्या संचालकांची माहिती

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेतल्या जाणार्‍या परीक्षांसाठी मोठा कालावधी लागत आहे. त्याचा ताण विद्यापीठाच्या यंत्रणेसह विद्यार्थ्यांवरही येतो. यामुळे परीक्षेचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा कार्यभार डॉ. काकडे यांनी नुकताच स्वीकारला. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा संचालकाची जबाबदारी पार पाडली आहे. विद्यापीठाचा लौकिक मोठा आहे. पण छोट्या छोट्या चुकांमुळे वेगळी चर्चा सुरू होते. या चुका टाळून चांगल्या पद्धतीने काम केले जाईल.

यामध्ये ‘पॉलिसी’, ‘प्रॅक्टिस’ आणि ‘प्रोसिजर’ या तीन ‘पी’वर भर दिला जाईल. विद्यापीठाकडून काही अभ्यासक्रमांची सत्र पद्धतीने (सेमिस्टर) परीक्षा घेतली जाते, तर काहींची वर्षाच्या शेवटी एकच परीक्षा होते. या परीक्षांसाठी मोठा कालावधी लागतो. परीक्षा लांबल्याने विद्यार्थी, महाविद्यालये, परीक्षक, विद्यापीठ या सर्वांवर ताण येतो. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात कार्यरत असताना तेथील परीक्षेचा कालावधी ८९ दिवसांवरून ५६ दिवसांवर आणला. त्याच पद्धतीने उपाययोजना करून परीक्षेचा कालावधी कमी करण्यात येईल, असे त्यांनी सागितले.

परीक्षा मंडळाकडे तीन पद्धतींच्या संगणक प्रणाली आहेत. त्यांच्यामध्ये समन्वय साधून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातील. वेळेत परीक्षा घेऊन निकालही वेळेत जाहीर करण्यावर भर देण्यात येईल.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com