बार असोशिएशनच्या सभेत तू-तू-मै-मै; वकीलांकडून भ्रष्टाचाराचे आरोप
स्थानिक बातम्या

बार असोशिएशनच्या सभेत तू-तू-मै-मै; वकीलांकडून भ्रष्टाचाराचे आरोप

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक बार असोसिएशनच्या (एनबीए) सर्वसाधारण सभेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वकिल आणि पदाधिकार्‍यामध्ये तू-तू-मै-मै बघायला मिळाली. बार असोसिएशनला समांतर महानगर वकील संघटना उभी केल्याने त्यावरून असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी संबंधितांन कानपिचक्या दिल्या. त्यानंतर अ‍ॅड. लिलाधर जाधव यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून बोलण्यासाठी व्यासपीठ गाठले असता, त्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही मिनिटे सुरू असलेला हा ‘कल्ला’ काहीवेळाने शांत झाला.

दरम्यान, नाशिकमध्ये प्रथमच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या सहकार्याने राज्यस्तरीय वकील परिषद घेतली येणार आहे. येत्या 15 व 16 फेब्रुवारी रोजी आयोजित या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते केले जाणार असून नूतन इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

सीबीएसजवळील एचआरडी सेंटरच्या सभागृहात नाशिक बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा (दि. 20)असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेमध्ये काही सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे सभेमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बार असोसिएशनचे ठाकरे यांनी, वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिल्यानंतर, नाशिक बार असोसिएशन ही महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलची अधिकृत संघटना असताना, महानगर बार असोसिएशन या नावाने कुणी समांतर संघटना सुरू केली असून ती अनधिकृत आहे.

संबंधित संघटनेकडून अधिकृत बार असोसिएशनच्या कामांमध्ये खोडा घालण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडियावरून बदनामीकारक मजकूर व्हायरल केला जात आहे. एका सीमारेषेपर्यंत सहन केल्यानंतर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देतानाच, ठाकरे यांनी, अशा अपप्रवृत्तीविरोधात एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी दीपप्रज्वलन केल्यानंतर असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी अहवालाचे वाचन केले. व्यासपीठावर असोसिएशनच सहसचिव अ‍ॅड. शरद गायधनी, सहसचिव अ‍ॅड. श्यामला दीक्षित, खजिनदार अ‍ॅड. संजय गिते, सदस्य अ‍ॅड. हर्षल केंगे, अ‍ॅड. महेश लोहिटे, अ‍ॅड. शरद मोगल, अ‍ॅड. सोनल कदम, अ‍ॅड. कमलेश पाळेकर उपस्थित होते. तर सभेला महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. राहुल कासलीवाल, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, अ‍ॅड. हेमंत गायकवाड यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य वकील उपस्थित होते.

राज्यस्तरीय वकील परिषद

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन आणि नाशिक बार असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय वकील परिषद प्रथमच नाशिकमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. येत्या 15 व 16 फेब्रुवारी रोजी परिषदेचे उद्घाटक सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित राहणार आहेत. तर, 300 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या नूतन इमारतीचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. गोवा व महाराष्ट्रातील चार ते पाच हजार वकिल या परिषदेसाठी येणार आहेत.

एनबीएवर भ्रष्टाचाराचे आरोप

बार असोसिएशनचे सदस्य शरद मोगल हे बोलत असताना, अ‍ॅड. लिलाधर जाधव यांनी व्यासपीठाकडे येत बोलण्यासाठी माईकची मागणी केली असता, त्यांना नकार देण्यात आला. त्यावेळी अ‍ॅड. जाधव यांनी, बार असोसिएशनने भरविलेल्या क्रिकेट स्पर्धा, नूतन इमारतीच्या जागेच्या उद्घाटन कार्यक्रमांसह अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार दिली असून न्यायालयात दावाही दाखल केल्याचे म्हणाले. तर, अ‍ॅड. झुंजारराव आव्हाड यांनीही आरोपांना पुष्टी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com