जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक
स्थानिक बातम्या

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उद्या गुरुवारी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेला नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष मिळणार असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील आरक्षित असल्याने या पदासाठी चांगलीच स्पर्धा झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच सत्तेवर येण्याचे संकेत नेत्यांनी दिले आहेत, मात्र रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीचे सूत जुळून येत नसल्याचे चित्र होते.

गुरुवारी जिल्हा परिषदेच्या नवीन रावसाहेब थोरात सभागृहात ही निवड होणार असून यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत असेल. १ ते १.१५ वाजेदरम्यान दाखल झालेल्या अर्जांची छाननी होईल. १.१५ ते १.४५ दरम्यान उमेदवारांना माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल. सध्या शिवसेनेच्या शीतल सांगळे विद्यमान अध्यक्ष आहेत.

सर्वसाधारण जागेमुळे रस्सीखेच
राज्यातील जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पं. स. सभापतींची अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर त्यांना चार महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती. जि.प.चा अध्यक्षपद तब्बल दहा वर्षांनी खुल्या प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धर्तीवर महाविकास आघाडी करण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सहलीला रवाना झाले. काँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना व राष्ट्रवादीने नकार दिला आहे. तीन सदस्यीय माकपला राष्ट्रवादीने सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा घोळ शेवटपर्यंत सुरू आहे. यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली असून त्यांनी सत्ता वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात अध्यक्षपद शिवसेनेला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. सध्या शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्षपदी असून काँग्रेसच्या नयना गावित उपाध्यक्षपद भूषवत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com