जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणूक दोन जानेवारीला
स्थानिक बातम्या

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणूक दोन जानेवारीला

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दि.२ जानेवारी ही निवड होईल. यासाठी जिल्हा परिषदेत खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पाठोपाठ दुसर्‍याच दिवशी दि. ३ जानेवारीला विशेष समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत असल्याने राजकिय हालचालीना वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेतही हीच आघाडी राहणार की वेगळेच ‘राजकारण’ शिजणार याकडे लक्ष वेधले गेले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत सद्या शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्षपदी आहेत. बारा वर्षानंतर अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांंची संख्या अधिक आहे. शनिवारी (दि.२१) प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी सदस्यांना निवडणुकीचे अजेंडे वितरीत करण्यात आले आहेत. दि.२ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या नवीन रावसाहेब थोरात सभागृहात ही निवड होणार आहे.

गुरूवारी (दि.२) सकाळी ११ते दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १.१५ ते १.३० दरम्यान दाखल झालेल्या अर्जाची छाननी होईल. १.३० ते १.४५ दरम्यान उमेदवारांना माघारीसाठी वेळ दिला जाईल.त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असा निवडणूक कार्यक्रम आहे.

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड झाल्यानंतर सात दिवसांनी विशेष समित्यांची सभापती निवडीकरिता सभा होत असते.मात्र, मुदत वाढीमुळे अगोदरच अवधी गेलेला असल्याकारणाने जिल्हा प्रशासनाने दि.३ जानेवारी रोजी पुन्हा विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत विशेष समित्यांच्या सभापती पदाची निवड होणार आहे. यासाठी सकाळी ११ ते १ वाजे दरम्यान सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले जातील. १.१५ ते १.३० दरम्यान दाखल झालेल्या अर्जाची छाननी होईल. १.३० ते १.४५ दरम्यान उमेदवारांना माघारीसाठी वेळ  दिला जाईल. त्यानंतर निवड प्रक्रीया पार पडेल.

सभापतीपदे राष्ट्रवादी व भाजपच्या वाटयाला गेलेली आहे. एकाही पक्षाकडे बहुमत नसल्याने अडीच वर्षांपूर्वी वेगवेगळया आघाड्या झाल्या होत्या. आता राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या धर्तीवर जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com