जि. प. सर्वसाधारण सभा : प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचेे अधिकार काढले  शिक्षण, बांधकाम विभाग फैलावर
स्थानिक बातम्या

जि. प. सर्वसाधारण सभा : प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचेे अधिकार काढले शिक्षण, बांधकाम विभाग फैलावर

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

पावसात पडझड झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी प्राप्त अडीच कोटी रुपये खर्च करण्यास विलंब केला असा ठपका ठेवत या प्रकरणी संंतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचे अधिकार काढून घेतले. तसा ठराव केला. ही मागणी करत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी यासाठी उपाध्यक्ष, शिक्षण सभापतींसह सदस्यांनी व्यासपीठासमोरच ठिय्या मांडला. यामुळे सीईओ भुवनेश्‍वरी एस. यांनी ही कारवाई केली. याबाबत विभागीय आयुक्तालयामार्फत त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत दुसर्‍या अधिकार्‍याकडे हा कार्यभार सोपवण्याचे आदेशही सीईओंनी दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान पदाधिकार्‍यांची अखेरची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. अडीच- तीन वर्षांत कधी नाही असे तीव्र पडसाद अधिकारी, पदाधिकारी व सदस्य यांच्यात अखर्चित निधीवरून या सभेत उमटले. विभागप्रमुख सदस्यांची कामेच करत नसल्याचा आरोप अनेक सदस्यांनी सभागृहात केला. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती यतिंद्र पगार, मनीषा पवार, अर्पणा खोसकर व सुनीता चारोस्कर उपस्थित होते.

शाळा दुरुस्तीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाला ऑगस्ट महिन्यात २ कोटी ४८ लाख रुपये मिळाले आहेत. जिल्ह्यातील २४ शाळांना २ ते २० लाख रुपयांपर्यंत निधी देण्याचे नियोजन शिक्षण सभापती यतिंद्र पाटील यांनी केले होते. त्यावर तीन महिन्यांपूर्वी शिक्षणाधिकारी डॉ. वीर यांनी स्वाक्षरी केली होती. परंतु गेल्या तीन महिन्यांत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या सदस्यांनी या विषयावरून भुवनेश्‍वरी एस. यांना जाब विचारला. सदस्य आक्रमक होत असल्याचे पाहून संबंधित विभागाकडून ही फाईल सभागृहात मागवण्यात आली.

मात्र यात तीन महिन्यांपासून ठोस कार्यवाहीच झालेली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सभापतींसह सदस्यांनी शिक्षणाधिकारी वीर यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. यावर तत्काळ निलंबित करणे शक्य नसल्याचे सांगत सीईओ भुवनेश्‍वरी एस. यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन सदस्यांना दिले. सीईओ वीर यांना पाठीशी घालत असल्याचे लक्षात येताच सदस्य चांगलेच आक्रमक झाले. आपला पवित्रा कायम ठेवत त्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन भारतीय बैठक मारत कारवाईची मागणी लावून धरली.

या सदस्यांना उपाध्यक्ष नयना गावित, खुद्द शिक्षण सभापती यतिंद्र पगार, सभापती अर्पणा खोसकर, सुनीता चारोस्कर, मनीषा पवार यांनीही व्यासपीठ सोडून सदस्यांसोबत ठिय्या मांडला. यावर अध्यक्ष सांगळे यांनी भुवनेश्‍वरी एस. यांना आदेश देत डॉ. वीर यांचे अधिकार तत्काळ काढून घेण्याची सूचना केली. यावर भुवनेश्‍वरी एस. यांंनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत दुसर्‍या अधिकार्‍याकडे कार्यभार सुपुर्द करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर नियमित विषयांना सुरुवात केली.

शिक्षणाधिकारी बच्छावांंचा माफीनामा
एका कामानिमित्त आलेल्या शिक्षकास माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांंनी ‘तू जिल्हा परिषद सदस्यांकडे कशाला गेला? तुझे आता काम करणार नाही’ अशी धमकी दिली. तेव्हापासून संबंधित शिक्षक आपला फोनसुद्धा घेत नसल्याची खंत सदस्य महेंद्रकुमार काले यांनी सभागृहात मांडत खातेप्रमुखांच्या वागणुकीचे वाभाडे काढले. चार महिन्यांपासून ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले जात असले तरी ‘आम्ही पुन्हा येणार नाही’ अशी भावना निर्माण झाल्याची खंतही काले यांनी मांडली. या प्रकरणी बच्छाव यांना तत्काळ विचारणा केली असता त्यांनी तत्काळ सदस्य व सभागृहाची जाहीर माफी मागितली.

सभापती-सदस्यांमध्ये तू-तू मै-मै
शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत असताना सभापती पगार यांनी त्यांना माफी मागण्याची सूचना केली. त्यावर उदय जाधव यांनी रोष व्यक्त करत ‘तुमचे काही लागेबांधे असतील म्हणून तुम्ही कारवाई करण्याऐवजी माफी मागायला सांगताय’, असा आरोप केला. त्यामुळे संतापलेले सभापती यतिंद्र पगार यांनी ‘आमचे काही लागेबांधे नाहीत. तत्काळ कारवाई करा. तत्काळ कारवाई होईल का? नाही तर कित्येक महिने चौकशीच सुरू राहणार का, अशी विचारणा भुवनेश्‍वरी एस. यांच्याकडे केली. गेल्या आठ वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य आहे, पण अशा प्रकारची वागणूक कधीच मिळाली नसल्याची खंतही पगार यांनी यावेळी बोलून दाखवली.

Deshdoot
www.deshdoot.com