Saturday, May 11, 2024
Homeनाशिकनाशिक जि.प. शिबिराची नोंद रक्तदान दिनाच्या राज्यस्तरीय जाहिरातीत

नाशिक जि.प. शिबिराची नोंद रक्तदान दिनाच्या राज्यस्तरीय जाहिरातीत

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर यांच्या संकल्पनेतून (दि.४ जून) घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा परिषद मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराची नोंद महाराष्ट्र शासनाने घेऊन नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव म्हणुन या शिबिराचे छायाचित्र रक्तदान दिनी (दि.१४) महाराष्ट्र शासनाने राज्याच्या जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

करोना पार्श्वभूमीवर देशात साधारण मागील तीन महिन्यांपासून लॉक डाऊन असल्यामुळे विविध रक्त पेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत होता. परिणामी अत्यावश्यक रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत रक्त साठा उपलब्ध न झाल्यामुळे जीव गमवावा लागत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लॉकडाऊन काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजवंतांसाठी रक्त उपलब्ध करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणुन व सामाजिक बांधिलकी म्हणुन नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने नाशिक जिल्हा परिषद मुख्यालय अंतर्गत कार्यरत पदाधिकारी, अधिकारी व सेवक यांच्यासाठी ४ जून रोजी नाशिक जिल्हा परिषदेचे कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेखा दराडे, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर, समाकल्याण समिती सभापती सुशीला मेंगाळ यांचेसह मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सर्व खाते प्रमुख व अधिकारी सेवक यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी सदरचा सन्मान हा सर्व रक्तदाते व रक्तदान शिबिरास सहकार्य करणाऱ्या पदाधिकारी,अधिकारी, सेवक यांचा असल्याचे नमूद करुन सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद रक्तदान दिनाच्या राज्यस्तरीय जाहिरातीत झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे साहेब यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे विशेष अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या