यशवंत पंचायत राज अभियान : विभागीय पुरस्कारांची घोषणा
स्थानिक बातम्या

यशवंत पंचायत राज अभियान : विभागीय पुरस्कारांची घोषणा

Abhay Puntambekar

कळवण व्दितीय, इगतपुरी पंचायत समिती तृतीय

नाशिक । प्रतिनिधी

पंचायत राज व्यवस्थांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार्‍या जिल्हा परिषदा,पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना देण्यात येणार्‍या सन २०१८-१९ साठीच्या ‘यशवंत पंचायत राज अभियान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हयातील कळवण पंचायत समितीला व्दितीय तर इगतपुरी पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.नाशिक जिल्हयाला दोन बक्षिस जाहीर झाली असून याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दोन्ही पंचायत समितीमधील अधिकारी, पदाधिकारी व सेवकांचे कौतुक केले.

पंचायत राज संस्थाना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामाची स्पर्धा निर्माण करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.विभाग आणि राज्य अशा दोन स्तरांवर हे पुरस्कार देण्यात येतात.

सन २०१८-१९ साठी राज्य स्तरावर जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग (प्रथम पारितोषिक),जिल्हा परिषद कोल्हापूर (द्वितीय पारितोषिक) आणि जिल्हा परिषद, यवतमाळ (तृतीय पारितोषिक) जाहीर करण्यात आले आहे. तर राज्य स्तरावर पंचायत समिती, कुडाळ, ता. सिंधुदुर्ग, पंचायत समिती, अचलपूर. जिल्हा अमरावती व पंचायत समिती राहाता जिल्हा अहमदनगर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय व तृतीय प्राप्त झाला आहे.

विभाग स्तरावर नाशिक विभागात अहमदनगर जिल्हयातील राहाता पंचायत समितीला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून नाशिक जिल्हयातील कळवण पंचायत समितीला व्दितीय तर इगतपुरी पंचायत समितीला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पंचायत राज संस्थांचे कामकाज, संस्थेची रचना, कार्यपद्धती, क्षमतावृद्धी, सेवक व्यवस्थापन आदी मुद्दयांवर जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांचे मूल्यांकन करण्यात करुन हे पुरस्कार देण्यात येतात.दरम्यान,जिल्हा परिषदेला विभागस्तरीय दोन पुरस्कार प्राप्त झाल्याबददल कळवण व इगतपुरी पंचायत समितीचे कौतुक होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com